Andheri East By Election : '166-अंधेरी पूर्व'साठी आज मतदान, किती उमेदवार अन् किती मतदार, काय-काय सुविधा - पोटनिवडणुकीबाबत सर्वकाही
166 अंधेरी पूर्व या मतदार संघाची पोटनिवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया ही गुरुवार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत होणार आहे.
Andheri East By Election: महाराष्ट्र विधानसभेच्या '166-अंधेरी पूर्व’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज 3 नोव्हेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधी दरम्यान होणारी मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यास प्रशासन सज्ज असून याकरिता आवश्यक ती सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. तसेच या अनुषंगाने अंधेरी पूर्व या मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदार केंद्रावर वेळेत पोहचून आपला मतदानाचा पवित्र हक्क आवर्जून बजवावा आणि नागरिक म्हणून आपले लोकशाही कर्तव्य ज़रुर पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
166 अंधेरी पूर्व या मतदार संघाची पोटनिवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया ही गुरुवार, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत होणार आहे.
मतदार संख्या तपशील :
पुरुष मतदार : 1 लाख 46 हजार 685
महिला मतदार : 1 लाख 24 हजार 816
तृतीय पंथीय मतदार: 1 (एक)
एकूण मतदार : 2 लाख 71 हजार 502
सेवा मतदार (Service Electors): 29
दिव्यांग मतदार : 419
80 पेक्षा अधिक वय असणारे नागरिक या वर्गवारीतील 430 मतदारांनी घरुन मतदान करण्यास सहमती दिली. त्यानुसार 392 मतदारांबाबत मतदान घरुन करण्याची कार्यवाही करण्यात आली.
एकूण मतदान केंद्रे : 256. ही मतदान केंद्रे 38 ठिकाणी कार्यरत असणार.
1 हजार पेक्षा अधिक मतदार संख्या असणारी मतदान केंद्रे : 163
1 हजार 250 पेक्षा अधिक मतदार संख्या असणारी मतदान केंद्रे : 44
256 मतदान केंद्रांपैकी 239 मतदान केंद्रे ही तळ मजल्यावर असून उर्वरीत 17 मतदान केंद्रे ही पहिल्या मजल्यावर आहे. पहिल्या मजल्यावर असणाऱ्या सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी उद्वाहन अर्थात लिफ्ट ची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सर्व ठिकाणी व्हिल चेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
सखी मतदान केंद्र : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार अंधेरी पूर्व परिसरातील मरोळ मरोशी मार्गावर असणाऱ्या मरोळ एज्यूकेशन अकादमी हायस्कूल येथे असणारे मतदान केंद्र क्रमांक ५३ हे सखी मतदान केंद्र म्हणून उभारण्यात आले आहे. या मतदान केंद्रामध्ये एकूण १ हजार ४१८ मतदार असून यापैकी ७२६ महिला; तर उर्वरित ६९२ मतदार हे पुरुष आहेत. या केंद्रातील महिला मतदारांची संख्या सर्वाधिक असल्याने हे मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सजविण्यात आलेल्या या मतदान केंद्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी महिला असणाार आहेत.
इव्हीएम व व्हीव्हीपॅट इत्यादी यंत्र तपशील : मतदान प्रक्रियेसाठी 333 कंट्रोल युनीट, 333 बॅलेट युनीट व 359 व्हीव्हीपॅट यंत्रे उपयोगात आणली जाणार आहेत.
मतदान विषयक यंत्र सामुग्री व संबंधित मनुष्यबळ वाहून नेण्यासाठी आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या पोटनिवडणूकीसाठी 07 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये खालील उमेदवाराचा समावेश आहे.
१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. श्री. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
३. श्री. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)
५. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. श्री. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. श्री. राजेश त्रिपाठी (अपक्ष)
केंद्रीय निरीक्षक : या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी 3 केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगा व्दारे करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी देवेश देवल, भारतीय पोलिस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी प्रवीण कोया आणि भारतीय राजस्व सेवेतील ज्येष्ठ अधिकारी सत्यजीत मंडल यांचा समावेश आहे.
सूक्ष्म स्तरीय निरीक्षक : वरील व्यतीरिक्त ७० ज्येष्ठ अधिकारी / कर्मचारी हे सूक्ष्म स्तरीय निरीक्षक (Micro Observer) म्हणून कार्यरत असणार आहेत.
मनुष्यबळ : प्रत्यक्ष मतदान प्रक्रीयेसाठी साधारणपणे १ हजार ६०० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्था : मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था सुयोग्य प्रकारे राहावी , यासाठी सुमारे १ हजार १०० इतके अधिकारी / कर्मचारी कार्यरत असणार आहे. यामध्ये मुंबई पोलिस दल, राखीव पोलिस दल, निमलष्करी दल , गृह रक्षक दल इत्यादींच्या मनुष्य बळांचा समावेश असणार आहे.
99.96 टक्के मतदारांकडे एपिक कार्ड : मतदान प्रक्रिये दरमान मतदारांची ओळख निश्चिती करण्यासाठी EPIC कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज आहे. या अनुषगांने अत्यंत महत्त्वाची व आवर्जून नोंद घ्यावी, अशी बाब म्हणजे मतदाराची ओळख पटवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाद्वारे जारी करण्यात आलेले मतदार ओळखपत्र अर्थात EPIC कार्ड हा पहिला पर्याय आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी पूर्व मतदार संघातील २ लाख ७१ हजार ५०२ मतदारांपैकी तब्बल २ लाख ७१ हजार ३९५ अर्थात ९९.९६ टक्के मतदारांकडे EPIC कार्ड आहे.
सर्व मतदार याद्यांमध्ये सर्व मतदारांची अर्थात 100 टक्के मतदारांची छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत.
अंधेरी पूर्व मतदार संघातील ९९.९६ टक्के मतदारांकडे भारत निवडणूक आयोगाद्वारे जारी करण्यात आलेले मतदार ओळखपत्र अर्थात EPIC कार्ड आहेत. ही बाब लक्षात घेता अंधेरी पूर्व मतदार संघातील सर्व मतदारांना आवाहान करण्यात येत आहे की, त्यांनी दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान अवश्य करावे आणि मतदानाला जाताना आपले EPIC कार्ड आठवणीने सोबत घेवून जावे.
सार्वजनिक सुट्टी : 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणाऱ्या मतदानासाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुट्टी '१६६ - अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मतदान केंद्रांच्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅन्डग्लोव्हज, मास्क, पी.पी.ई. कीट, थर्मामिटर गन आणि कोविड विषयक मार्गदर्शन फलक इत्यादी व्यवस्था करण्यात आली आहे.