Umesh Kolhe Murder : अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्येप्रकरणातील आरोपीला दिलासा नाहीच, जामीन देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार
Umesh Kolhe Murder : अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपीचा जामीन देण्यास मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टानं नकार दिला आहे.
अमरावती : अमरावतीमधील (Amravati) फार्मासिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्येप्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिलाय. कोल्हे हत्याप्रकरणातील आरोपी मुशीफिक अहमदला मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं जामीन नाकारला. गुन्ह्याच्या कटात आरोपीचा सक्रिय सहभाग असल्याचे पुरावे आढळले असल्याचं निरीक्षण कोर्टानं केलं आहे. मागील वर्षी अमरावतीतील फार्मसिस्ट उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. प्रेषित मोहम्मद पैगंम्बर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यामुळे कोल्हे यांची 21 जून 2022 रोजी अमरावती शहरात हत्या करण्यात आली.
प्रकरण नेमकं काय?
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र तपसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.
22 जून 2022 रोजी उमेश कोल्हे यांची हत्या
अमरावती तहसील कार्यालयाजवळ असलेल्या मॉलमध्ये मृत उमेश कोल्हे यांचे अमित व्हेटर्नरी मेडिकल नावाने दुकान होते. 22 जून रोजी हत्येच्या रात्री उमेश कोल्हे हे मुलगा संकेत आणि सून वैष्णवी यांच्यासोबत वेगवेगळ्या दुचाकीने घरी जात होते. वाटेत न्यू हायस्कूल मेन शाळेजवळ असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी उमेश कोल्हे यांची दुचाकी अडवली आणि झटापटीत कोल्हे यांच्या मानेवर चाकूने वार केले. या हल्ल्यात कोल्हे यांच्या मानेची मुख्य नस कापली गेल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच कोल्हे यांचा मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच कोल्हे यांचा मुलगा आणि सून त्यांच्या मदतीसाठी धावले, मात्र अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले. दोन हल्लेखोरांनी गाडी अडवून हल्ला केला आणि पसार झाले अशी माहिती उमेश कोल्हे यांच्या मुलाने पोलिसांना दिली होती.