Supriya Sule: एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, सुप्रिया सुळेंचा हल्ला, कुटुंबाची प्रायव्हसी जपण्याचं आवाहन
Supriya Sule on Badlapur School: राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
Supriya Sule on Badlapur School: गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत, अशातच बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आता पालक आणि बदलापूरमधील (Badlapur School) नागरिक संतप्त झाले आहेत. ते रस्त्यावर उतरले आहेत, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
एपीबी माझाला प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, अशा नराधमांना लोकांच्या समोर फाशीची शिक्षा द्या, ही एकदम घाणेरडी विकृती आहे. यामध्ये मला राजकारण आणायचं नाही, हा एक सामाजिक विषय आहे. आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. अशा विकृत लोकांना एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, त्यांना असं वागण्याची भिती वाटली पाहिजे, कुठल्या महिलेकडे पाहताना धडकी भरली पाहिजे, हात लावणं तर दूरची गोष्ट पण पाहताना देखील दहा वेळा विचार केला पाहिजे, असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.
तर सरकारने याबाबत खुप कठोर कारवाई केली पाहिजे. राज्यात महिलांबाबत होणारे अन्याय अत्याचार गेल्या काही दिवसात वाढतच चालले आहेत. कमी होताना दिसत नाहीत. २०० कोटींच्या जाहीराती करून लाडकी बहीण करत काही जण फिरत आहेत, पण या बहिणींची, लेकींची सुरक्षा त्यापेक्षा महत्त्वाची आहे. हा संवेदनशील विषय आहे, तो संवेदनशील पध्दतीने जपला गेला पाहिजे. त्यांच्या बद्दलची माहिती त्यांची ओळख, त्यांचं नाव हे पुर्णपणे लपवले गेले पाहिजे. त्या मुलींसमोर पुर्ण आयुष्य आहे, त्या कुटुंबाची प्रायव्हसी जपली गेली पाहिजे. त्या मुलींचं आणि कुटुंबाचं समुपदेशन केलं गेलं पाहिजे, असंही सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) पुढे म्हटलं आहे. सरकारने या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
काय आहे प्रकरण?
बदलापूर पूर्वेला असणालेल्या एका नामांकित शाळेतील एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या अशा दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुरुवातीला शाळा प्रशासन आणि पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जेव्हा पीडित मुलींचे पालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना तेथील महिला पोलीस अधिकाऱ्याकडून तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यांची तक्रार नोंद करून घेण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचीही माहिती आहे.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
मी पोलीस आयुक्तांशी स्वत: बोललो, त्या आरोपीला अटक झाली आहे, जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होईल, पोक्सो अंतर्गत कलमं लावायला सांगितलं आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल, आरोपीला कठोर शिक्षा होईल. या खटल्यास विशेष पीपी नेमण्यास सांगतिलं आहे. संस्था चालकांचीही चौकशी करुन जे दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करु.पोलिसांनी अरेस्ट केलं आहे, पोलिसांना अटेम्पट टू रेप हा खटला दाखल करायला सांगितलं आहे.. संस्थाचलकांनीही कर्मचारी ठेवताना बॅकग्राऊंड तपासलं पाहिजे, जर तसं झालं नसेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल.अत्यंत कठोर कारवाई करु, पोलीस, गृह विभाग आणि सरकार पूर्ण कठोर कारवाई करण्याच्या बाजूने असतील. कोणी पोलीस असतील जे यात दोषी आढळले तर त्यांनाही सोडणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
VIDEO- एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय नराधमांना धडकी भरणार नाही - सुप्रिया सुळे