(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Stone Pelting: पवईत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या BMCच्या पथकावर तुफान दगडफेक, पाच ते सहा पोलीस जखमी
Mumbai News: संतापलेला जमाव धावून आला, पालिका अधिकाऱ्यांसाठी पोलिसांची ढाल, तुफान दगडफेकीनंतर पवईत तणाव. जय भीमनगर परिसरातील झोपड्यांवर अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई.
मुंबई: मुंबई उपनगरातील पवई परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पवईच्या (Powai) भीमनगर परिसरात हा प्रकार घडला. याठिकाणी असलेल्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. जय भीमनगर (Jay Bhimnagar) हा झोपडपट्टीचा परिसर आहे. येथील काही झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. मात्र, स्थानिकांच्या जमावाने वस्तीच्या तोंडाशी उभे राहून वाट अडवून धरली. त्यानंतर या जमावाने पालिका अधिकाऱ्याच्या दिशेने दगडांचा तुफान मारा केला. यावेळी केवळ मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police) जवान प्रोटेक्शन शील्ड घेऊन उभे राहिल्यामुळे पालिका अधिकारी थोडक्यात बचावले. मात्र, या तुफान दगडफेकीत पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे.
दोन महिन्यांपूर्वी या झोपडपट्टी भागात आगीची घटना घडली होती त्यानंतर या ठिकाणच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिकेकडून जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज कारवाईसाठी अधिकारी आले असताना अधिकाऱ्यांवर जमावाने दगडफेक केली. रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तात्काळ मुंबई महापालिकेने कारवाई थांबवली.
नेमकं प्रकरण काय?
2005 साली पवईतील जयभीमनगर परिसरात कामगारांना तात्पुरता ट्रान्झिस्ट कॅम्प तयार करण्याची परवानगी देण्यात आली होती. नंतरच्या काळात याठिकाणी झोपड्यांची मोठी वसाहत निर्माण झाली. ही जागा शासकीय वसाहतीसाठी राखीव असल्याने पालिकेने अनेकदा याठिकाणी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. आजदेखील पालिकेचे पथक पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण पाडण्यासाठी याठिकाणी आले होते. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांनी वस्तीच्या तोंडावर उभे राहून पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांची वाट रोखून धरली. पालिका अधिकाऱ्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक रहिवाशांनी दगडांचा तुफान मारा सुरु केला. पोलिसांनी त्यांच्याकडे असणाऱ्या फायबरच्या ढालींनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक इतकी जोरात झाली की, यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत.
पवईकरांनो, जयभीमनगर झोपडपट्टी वाचविण्यासाठी पुढे या; झोपडपट्टीवासियांचं आवाहन
गेली 25 वर्षे ऊन-वारा-पाऊस झेलत आपल्या कुटुंबियांसह राहत असलेल्या पवईतील जयभीम नगर येथील सुमारे 800 झोपड्यांना मुंबई महानगरपालिकेने बेकायदेशीर ठरवत त्यांना 488 अंतर्गत निष्कासनाची नोटीस बजावली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या दलित- गरीब व शोषित घटकांना बेघर करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. काल- परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत येथील झोपडीधारकांनी कामाच्या सुट्ट्या टाकून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. त्यामुळे मतदान घेताना कायदेशीर आणि मतदान संपल्यानंतर हे लोक बेकायदेशीर कसे? असा जळजळीत सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.
यासंदर्भात स्थानिक रहिवाशांकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकात पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांवर दडपशाहीचा आरोप करण्यात आला आहे. या पत्रकात म्हटले आहे की,नियमाच्या आडून पालिका व पोलिसांनी येथे बेबंदशाही सुरू केली आहे. यातून या झोपडीधारकांना घाबरवणे, धमकावणे व भयाचे वातावरण निर्माण करून यांना झोपड्या रिकाम्या करण्यास मजबूर करणे यात प्रशासन काही प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहेत. तर, अनेक झोपडीधारकांनी आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या घरासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याचे ठरवले आहे.
एका नामवंत(?) बिल्डरच्या दबावाखाली पालिका, पोलिस व राजकारणी सदर झोपड्यांच्या मुळावर उठले आहेत. तर, येथील पुढारी म्हणवणाऱ्या काहींनी बिल्डरशी संधान बांधून, लाखो रुपये घेउन येथून पळून जाण्याची तयारी सुरू केली आहे. अश्यावेळेला हे गरीब, असहाय्य झोपडीधारक एकटे पडले आहेत. त्यांना कुणीही साथ देण्यास पुढे सरसावत नाही.
पवईची ओळख ही मुंबई शहरात उच्चभ्रू परिसर म्हणून असली तरी, पवई ही अर्ध्याअधिक झोपडपट्टी, चाळकऱ्यांची वस्ती आहे. येथे रमाबाई आंबेडकर नगर, गौतम नगर, इंदिरा नगर, महात्मा फुले नगर, मोरारजी नगर, हरिओम नगर आदी. महत्वाचे भाग हे झोपडपट्ट्यांनी व्यापले आहेत. या जयभीम नगर झोपडपट्टीच्या अस्तित्वाच्या संघर्षात आपण जर त्यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर, "आज ते जात्यात आहेत आणि आपण सुपात..." एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
आणखी वाचा
चिकन घेण्यावरून हिंगोलीत जोरदार राडा, दोन गटात तुफान दगडफेक; घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त