(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Mumbai Metro Line 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.5) आरे ते बीकेसी मेट्रो लाईन 3 चे लोकार्पण करण्यात आले.
Mumbai Metro Line 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण आज (दि.5) करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींनी मेट्रोचे लोकार्पण केल्यानंतर बीकेसी ते सांताक्रुझ असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी महिला, मेट्रोचे कामगार आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
बीकेसी ते आरे दरम्यान किती किलोमीटरचा प्रवास?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेला मेट्रो 3 हा प्रकल्प एकूण 33.5 किलोमीटरचा आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12.44 किलो मीटरची सेवा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई मेट्रो 3 च्या कामाला सात वर्षांपूर्वी सुरुवात झाली होती. आज त्याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी या मार्गावरील काम पूर्ण झालं असून आरेमध्ये मेट्रोचं कारशेड असून बीकेसी ते सीप्झ या दरम्यान प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
तिकीट दर किती? किती वेळ लागणार?
बीकेसी ते कफ परेड या दुसऱ्या टप्प्याचं काम यापूर्वीच सुरु करण्यात आलेलं आहे. या टप्प्याचे लोकार्पण देखील पुढच्या वर्षी होईल, असे बोलले जात आहे. दरम्यान मेट्रोचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (दि.5) बीकेसी ते सांताक्रुझ स्टेशन दरम्यान प्रवास देखील केला आहे. आरे ते बीकेसी या दरम्यानचा प्रवास केल्यास 30 मिनीटांचा वेळ लागणार आहे. मेट्रोच्या या मार्गावर दर साडे सहा मिनिटांनी सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. या मेट्रोची सेवा सकाळी 6.30 वाजता ते रात्री 10.30 वाजेपर्यंत सुरु राहील. तिकीट दर 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत असेल.
दिवसभरात मेट्रोच्या किती फेऱ्या?
पीएम मोदींनी लोकार्पण केलेल्या मेट्रो 3 च्या दिवसभरात जवळपास 96 फेऱ्या होणार आहेत. या 96 फेऱ्या आरे जेवीएलआर ते बीकेसी या दरम्यान असतील. शिवाय यामध्ये 9 मेट्रो स्थानकांवर प्रवाशांना मेट्रोत प्रवेश मिळेल. या मेट्रोचा वेग 85 किलोमीटर प्रतितास इतका असेल, अशी माहिती आहे.
मेट्रो किती आणि कोणत्या स्टेशनवर थांबणार?
आरे ते बीकेसी दरम्यान 9 मेट्रो स्थानक ही उड्डाणपुलावरुन नाहीत तर भूमिगत असणार आहेत. यामध्ये बीकेसी, विद्यानगरी स्टेशन, सांताक्रुझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1, सहारा रोड,छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2, मरोळ नाका, एमआयडीसी , सीप्झ स्टेशन ही मेट्रोची भूमिगत स्टेशन असणार आहेत. मुंबई मेट्रो 3 चा प्रकल्प खर्च 37 हजार 27 कोटी रुपये आहे. या मार्गिकेवर 27 स्टेशन आहेत. स्टेशन 26 स्टेशन भूमिगत असून 1 ग्रेड स्टेशन असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या