BMC : कोविड काळातला 4 हजार कोटींचा हिशेबच पालिकेकडे नाही? माहिती अधिकारातून धक्कादायक उत्तर
BMC : मुंबई महानगरपालिकेकडे कोविड काळात खर्च केलेल्या 4 हजार कोटी रुपयांचा हिशेबच नसल्याची धक्कादायक बाब आरटीआयच्या अहवालातून समोर आली आहे.
मुंबई : मुंबईतील एका कार्यक्रमात पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कोविड काळात मुंबई महानगपालिकेने (BMC) 4 हजार कोटींचा खर्च केला असल्याचा दावा केला होता. पण कोविड (Covid) काळात 4 हजार कोटींचा खर्चाचा तपशील पालिकेकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या उत्तरातून समोर आलीये. आरटीआयच्या माध्यमातून महापालिका आयुक्त कार्यालयात अर्ज करत कोविड काळात करण्यात आलेल्या 4 हजार कोटींचा खर्चाबाबत सादर अहवालाची प्रत मागितली होती. पण ही प्रत उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आल्याचा दावा अनिल गलगली यांनी केलाय.
सुरुवातीला आरटीआय अहवालाची प्रत ही आयुक्त कार्यालयाने उप प्रमुख लेखापाल ( आरोग्य) यांच्याकडे सुपूर्त केली. त्यानंतर उप प्रमुख लेखापाल लालचंद माने यांनी अहवालाची प्रत उपलब्ध नसल्याचे सांगितले आणि तो अर्ज सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप आयुक्त यांच्याकडे हस्तांतरित केली. प्रशासकीय अधिकारी चि. गे. आढारी यांनी तो अर्ज वित्त विभागाचे प्रमुख लेखापालांकडे हस्तांतरित केला. लेखा अधिकारी राजेंद्र काकडे यांनी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज पुन्हा आरोग्य विभागाच्या उप प्रमुख लेखापालांकडे हस्तातंरित केला असल्याची महिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली.
माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची मागणी
मुंबईत कोविड कालावधीमध्ये 4 हजार कोटी रुपयांचा खर्च केला असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर या खर्चासंदर्भात अनेक आरोप आणि दावे होत गेले. याची चौकशी देखील ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यातच आता आरटीआयच्या अहवालात देखील ही माहिती मिळत नसल्यामुळे यावर शंका उपस्थित करण्यात येतेय. तसेच या खर्चाची तपशीलवार माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी देखील आरटीआयच्या या अहवालात करण्यात आलीये.
एका बाजूला कोविड काळामध्ये भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा आरोप सध्या केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक आणि मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशी सरु करण्यात आलीये. तसेच दुसरीकडे स्वतः पालिका आयुक्त 4 हजार कोटींचा हिशोब देत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. ही बाब अत्यंत गंभीर असून याकडे तात्काळ लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान आता या प्रकरणात मुंबई महानगरपालिकेकडून काय उत्तर येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. त्यातच या प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्यांची चौकशी देखील सुरु आहे, त्यामुळे या प्रकणात आणखी कोणते खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.