मोठी बातमी! दिवाळीचा प्रवास महागला, गावी जाण्यासाठी जादा पैसे; महामंडळाकडून ST भाडेवाढीचा निर्णय
राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी 10 टक्के दरवाढ लागू करण्यात येत आहे.

मुंबई : राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच सर्वसामान्यांच्या लाल परीची (ST bus) पुन्हा एकदा भाडेवाढ होणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दिवाळीपूर्वीच (Diwali) प्रवाशांच्या (Passenger) खिशाला झळ बसणार असून एसटी महामंडळाची भाडेवाढ यंदाही निश्चित करण्यात आल्याचे समजते. एसटी महामंडळाकडून ‘दिवाळी’साठी 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत ही भाडेवाढ लागू असणार आहे. दिवाळी सणासाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. सध्या चारचाकी खासगी वाहने वाढली असली तरीही एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र, आता एसटीचा प्रवास महागडा प्रवास होणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी 10 टक्के दरवाढ लागू करण्यात येत आहे. त्यामुळे, गावखेड्यापासून ते रातराणीने लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार आहे. आधीच राज्यातील बळीराजा अतिवृष्टीने खचून गेलेला असताना, आता दिवाळीपूर्वीच सार्वजनिक वाहतूक प्रवासाच फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. या नव्या भाडेवाढ निर्णयानुसार, जिथं 100 रुपये भाडे (तिकीट) होते, तिथं आता 110 रुपये दर आकारले जाऊ शकतात.
राज्यात गतवर्षी एकीकडे टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांकडून प्रवास भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला असताना दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे, नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागला होता. 24 जानेवारी 2025 पासून एसटीची भाडेवाढ लागू करण्यात आली होती. त्यावेळी, झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) बैठकीत 14. 95 टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली असून त्यासंदर्भातील अधिकृत घोषणाही करण्यात आली होती.
























