Virar Attack: विरार रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना, पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला, रेल्वे ब्रीजवर रक्ताचा सडा
Maharashtra Crime News: विरार रेल्वे स्थानकाचा परिसर हा गजबजलेला असतो. मात्र, याचठिकाणी एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विरार: काही दिवसांपूर्वी वसईत एका प्रियकराने लोखंडी पान्याने आपल्या प्रेयसीला ठार मारल्याची घटना ताजी असतानाच विरारमध्येही असाच प्रकार घडला आहे. पण नशीब बलवत्तर असल्याने या घटनेतील महिला सुदैवाने बचावली आहे. विरार रेल्वे स्थानकाच्या (Virar Railway station) परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर (Husband attack on wife) जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. शिव शर्मा आणि वीरशिला शर्मा असे या दाम्पत्याचे नाव आहे. या दोघांमधील कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. मात्र, विरार स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरशिला शर्मा ही कामावर जात असताना शिव शर्माने तिच्यावर हल्ला चढवला. विरार रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकला लागून असलेल्या पादचारी पुलावर हा प्रकार घडला. वीरशिला शर्मा बुधवारी सकाळी साडेसात वाजता कामाला निघाली होती. त्यावेळी तिचा नवरा शिव शर्मा याने तिला विरारच्या रेल्वे ब्रीजवर एकटे गाठून तिच्यावर हल्ला केला. शिव शर्मा याने वीरशिला हिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर ओढणीने तिचा गळा आवळण्याचाही प्रयत्न केला. परंतु, वीरशिला हिने चाकूचे पाते हाताने धरुन ठेवले. यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला. मात्र, चाकू हल्ला रोखताना तिच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे. तिच्या गळ्यावरही चाकूचा एक वार झाला आहे.
वीरशिला शर्मा हिच्यावर सध्या विरारच्या संजावनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तिचा पती शिव शर्माला ताब्यात घेतले आहे. शिव आणि वीरशिला यांच्यात वाद होता. कौटुंबिक वाद मिटविण्यासाठी काल हे दोघेही विरार पोलीस ठाण्यात गेले होते. पण पोलिसांनी त्यांना समजावून सोडले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
वसईत तरुणीचा विनयभंग, आयफोन पळवला
वसईत शनिवारी रात्री उशीरा कामावरून परतणार्या ३२ वर्षीय एका चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा वसई रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरून, विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माणिकपूर पोलिसांनी या घटनेचा जलद तपास करून 24 तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.
वसई रोड रेल्वे स्थानक हे वर्दळीचे रेल्वे स्थानक असून हा परिसर महिलांसाठी सुरक्षित मानला जातो. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत महिला रेल्वेतून प्रवास करत असतात. मात्र रेल्वे स्थानक परिसरात या तरुणीचा विनयभंग झाल्याने खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी चार्टर्ड अकाउंटंट असून वसईच्या अंबाडी रोड परिसरात राहते. हा परिसर जवळ असल्याने ती चालत घरी जाते. शनिवारी रात्री ती नेहमीप्रमाणे रात्री उशीरा वसई रोड स्थानकात उतरली. रात्री दीडच्या सुमारास तुंगारेश्वर गल्लीतून ती चालत जात असताना एका इसमाने तिला अडवले. तिचे तोंड दाबून तिला खाली पाडून तिला विनयभंग केला. त्यानंतर या तरुणीचा महागडा आयफोन घेऊन पळ काढला. खाली पडल्याने तिला दुखापत झाली होती. तिच्यावर नवघरच्या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांना मिळताच विशेष पथक स्थापन करून आरोपीचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा माग काढण्यात आला. नालासोपारा येथून संदीप खोत (३५) या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्यावर मुंबईत आणि वसई विरार मध्ये फसणुकीचा गुन्हा दाखल आहे.
आणखी वाचा
दोन मिनिटाचा राग आला आणि तिला संपवलं, वसई हत्याकांडातील आरोपीचा खळबळजनक खुलासा