(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goregaon Fire: 'एसआरएच्या इमारतींचे ऑडिट होणार', गोरेगावातील आगीमधील जखमींची मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली भेट
Mumbai Goregaon Fire News : गोरेगावातील इमारतीला लागलेल्या आगीमध्ये जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. दरम्यान यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची देखील पाहणी केली.
मुंबई : गोरेगावातील (Goregoan) इमारीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या भीषण (Fire) आगीमध्ये अनेकांचा होरपूळ मृत्यू झाला. दरम्यान यावेळी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी जखमींची कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच यावेळी त्यांनी या प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं. पण एसआरएच्या सर्व इमारतींचे ऑडीट होणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीये.
दरम्यान गोरेगावात इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून झालीये. तर जखमींच्या उपचारांचा खर्चही राज्य सरकार करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पोलिस अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. स्क्रॅपमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांच्या परिवाराला शासनाकडून पाच लाखांची मदत करण्यात येणार आहे. जखमींचा उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाणार आहे .
मुख्यमंत्री काय म्हणाले ?
या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या लोकांची यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडणार नाही, अशा प्रकराच्या सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे. तर इमारत कोणाचीही असो यापुढे महानगरपालिकेचा एक अधिकारी त्याचे ऑडिट करण्यात येईल. तसेच एसआरएच्या सर्व इमारतींचे आता ऑडिट करण्यात येईल. तर यासंदर्भात पुढील चौकशी देखील करण्यात येत आहे."
जखमींवर उपचार सुरु
जखमी झालेल्यांवर सध्या कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या भीषण आगीत 30 पेक्षा अधिक दुचाकी आणि चार कार जळून खाक झाल्यात. तसेच तळमजल्यावरील काही दुकानंही जळून खाक झालेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती. ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत होती. ही आग लेवल दोन प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या 30 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे तर 58 जण या आगीमध्ये जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.