Mumbai Goregaon Fire News : अग्नीतांडव! मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, सात जणांचा होरपळून मृत्यू तर 58 जखमी
गोरेगावमध्ये लागलेल्य भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 58 जण जखमी झाले आहेत.
मुंबई : मुंबईतील (Mumbai Goregaon Fire News) आगीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 58 जण जखमी झालेत. तर 30 जणांना सुखरुप रेस्क्यू करण्यात आलंय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. या आगीमुळं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक याचा तपास करत आहेत.
गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती. ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत होती. ही आग लेवल दोन प्रकारची असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या 30 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे तर 58 जण या आगीमध्ये जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढून मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्याची माहिती देखील मिळत आहे. नागरिक झोपेत असल्याने बाहेर पडण्यास उशीर झाला. त्यामुळे आकडा वाढल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
#WATCH | Maharashtra | Latest visuals from the G+5 building in Goregoan, Mumbai where a level 2 fire broke out.
— ANI (@ANI) October 6, 2023
As per Mumbai Police, the condition of six people rescued is critical. A total of 30 people have been rescued. https://t.co/G3Z0MihDc3 pic.twitter.com/Vn73WMFwFH
आगीची घटना घडली त्यावेळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी दिल्या महितीनुसार, मध्यरात्री तीन वाजता मोठा ब्लास्ट झाला. ब्लास्टच्या आवाजाने आम्ही जागे झालो त्यानंतर खाली पाहिले तर आग लागली होती. घरातील सर्वांना उठवले आणि बाहेर पडताना इमारतीतील सर्व सदनिकांच्या बेल वाजवल्या आणि लवकर घराबाहेर पडण्यास सांगितले. पार्किंगमध्ये भंगाराचे दुकान आणि जुने कपडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळेच आग भडकल्याचा अंदाज आहे.