महेश शिंदे म्हणाले, 'अमोल मिटकरी म्हणजे राजकारणातील काळा डाग'; मिटकरी म्हणाले, 'आम्हाला आई-बहिणींवरुन शिवीगाळ'
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ आणि वादात केंद्रस्थानी असलेल्या शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.
Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनात (Maharashtra monsoon assembly session)आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावेळी शिंदे गटातील महेश शिंदे (Mahesh Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचं बोललं जात आहे. यावेळी काही आमदारांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा गोंधळ उभ्या महाराष्ट्राने पाहिला.
या वादात केंद्रस्थानी असलेल्या शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विचाराचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी - आमदार महेश शिंदे
आमदार महेश शिंदे यांनी म्हटलं की, आम्ही आंदोलन करत असताना विरोधी पक्षातील आमदारांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. अर्वाच्च भाषेत बोलत होते, गाजर आणले होते. आम्ही शांततेच्या मार्गानं आंदोलन करत होतो. अमोल मिटकरींबद्दल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील विचाराचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी, आम्ही शांतपणे आलो होतो, अमोल मिटकरींनी आम्हाला ढकललं. अमोल मिटकरी लोकशाहीवादी विचारांचे नेते नाहीत. अशा विचारांच्या लोकांवर त्यांच्या वरिष्ठांनी कारवाई करावी. असे लोक लोकशाहीसाठी घातक आहेत. एखादं प्रकरण दुसऱ्या दिशेला कसं न्यायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांनी अर्वाच्च भाषा वापरली. 'लवासाचे खोके-बारामती ओक्के' या घोषणा त्यांना लागल्या. आमचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला, आम्ही याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार आहोत. आम्ही आंदोलन करताना त्यांनी येणं चुकीचं होतं. आम्ही त्यांच्या आंदोलनावेळी तिथं गेलो नव्हतो. आमच्या गद्दारीचे आरोप केले, आम्ही आंदोलन केलं तर का चिडले. आमची आंदोलनं दाबत आहेत. महाराष्ट्राशी गद्दारी तुम्ही केली आहे. अर्थ खातं असताना महाराष्ट्राला लुटलं. बारामतीला जे पैसे गेले ते बघा. ते बाहेर येतील याची यांना भीती वाटत आहे. सचिन वाझेच्या रुपातून गद्दारी तुम्ही केली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहूनच आम्ही आंदोलन केलं आहे, असं आमदार शिंदे यांनी म्हटलं आहे.
अमोल मिटकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सत्ताधाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. सुरुवातीला महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्याची तक्रार अमोल मिटकरी यांनी केली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे एकमेकांमध्ये भिडले होते. मिटकरी यांनी सत्ताधारी आमदारांनी धमकावलं असल्याचं देखील म्हटलं आहे. आम्हाला सत्ताधाऱ्यांकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ ही करण्यात आलीय. धक्काबुक्कीनंतर आम्हाला धमकी देण्यातही सत्ताधारी मागे नव्हते, असं मिटकरी म्हणाले. आज सत्ताधारी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. काल महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बैठक झाली होती. सध्याच्या घडीला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यासाठी मविआचे सर्व आमदार विधानभवन परिसरात जमा झाले होते. आम्ही आंदोलन करत असताना शिंदे गटातील एका शिंदे नावाच्या आमदाराने धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आई-बहिणींवरून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जपणारे लोकं आहोत, पवारसाहेबांनी आम्हाला दिलेली शिकवण आम्ही कधीही विसरणार नाही, असं ते म्हणाले. मी जनतेची एकवेळ माफी मागेन पण या आमदारांची माफी कधीच मागणार नाही, असंही मिटकरी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या