Aaditya Thackeray : अदानीच्या फायद्यासाठी मुंबईकरांवर घन कचरा कर लावण्याचा घाट, त्याला विरोध करा; आदित्य ठाकरेंचे आवाहन
Aaditya Thackeray : मुंबईतील सर्व घरांवर आणि छोट्या-मोठ्या दुकानांवर घन कचरा कर लावण्यात येणार आहे. त्याला प्रत्येक मुंबईकराने विरोध करावा असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

मुंबई : शहर आधीच खड्ड्यात घातलं जात आहे, त्यातच आता मुंबईकरांवर घन कचरा कर लावला जात आहे. हा अदानी कर असून तो आम्ही देणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. महापालिकेकडे कचरा उचलण्याची सर्व यंत्रणा असतानाही कचरा उचलला जात नाही. त्यातच आता देवनार डम्पिंग ग्राऊंड हे अदानीच्या घशात घातलं जाणार आहे असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, "मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कचऱ्यावर कर लावला जाणार आहे. देवनार डम्पिंग ग्राउंड अदानीला दिला जातोय. मुंबईतल्या रस्त्यांमुळे सगळे आमदार, खासदार, मुंबईकर त्रस्त आहेत. मुंबईच खड्ड्यात आहे आणि मुंबईवर अदानी टॅक्स लावला जात आहे. आमच्या काळात घन कचरा टॅक्स असा काही विषय नव्हता. पण आता मुंबईची लूट सुरू आहे. उद्धव ठाकरे सरकारने 500 स्क्वेअर फुटांपर्यतच्या घराला मालमत्ता कर टॅक्स फ्री केला होता. पण आता मुंबईतील 500 स्क्वेअर फुटांच्या घराला सुद्धा हा कचरा टॅक्स लावणार आहे."
कचऱ्यावरचा कर वाढवला जाईल
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, "मुंबईतील घन कचऱ्यावर आज लावला जाणारा कर हा तीन वर्षांनी वाढवला जाईल. पण अदानीच्या मनात आलं तर पुढल्या वर्षीही वाढवला जाईल. छोटी दुकानं, घरं या सगळ्यांवर कर लावला जाईल. सगळीकडे कर लावला जातोय कारण या सरकारने गेल्या अडीच वर्षांत मुंबई महानगरपालिकेची लूट केली आहे. मी सगळ्या मुंबईकरांना आवाहन करत आहे की या घन कचरा शुल्काचा कडाडून विरोध करा. हा अदाणी कर आहे, हा आपल्यावर लादला जातोय. याचा विरोध करा."
घन करचा कराला मुंबईकरांनी विरोध करावा
आदित्य ठाकरे म्हणाले की, "गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईवर सगळ्याप्रकारचे कर लावले जात आहेत. 31 मे पर्यंत यासंबंधी सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मुंबईकरांने याचा विरोध करत कर देणार नाही असं सांगितलं पाहिजे. हा कर आमच्याकडून घेण्यापूर्वी बीएमसीने अदाणींकडून साडेसात हजार कोटींचा प्रीमिअम घ्यायला पाहिजे. तो त्यांनी माफ केला आहे."
आदित्य ठाकरे म्हणाले की, "गेल्या अडीच वर्षांत रस्त्यांची दुरवस्था, पाण्याची बिकट परिस्थिती आपण पाहिलीच आहे. कचरा तर उचललाच जात नाही. ती यंत्रणा तुमच्याकडे आहे मग पैसे कशाला लावताय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. निवडणुकीआधी ज्या कामांचे भूमीपूजन केलं गेलं त्या कामांना अजूनही सुरूवात केली नाही. बीएमसीमध्ये 15 वॉर्ड अधिकारी नाहीत असंही आदित्य ठाकरे म्हणाले."
लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांच्या योजना असतील, तसेच शिवभोजन थाळी बंद केली, मध्यान आहारमधून अंडी बंद केली. त्यामुळे हे सरकार एप्रिल फुल सरकार आहे असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
आम्ही काय खायचं ते तुम्ही ठरवणार का?
राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणावर प्रतिक्रिया देण्यास आदित्य ठाकरे यांनी नकार दिला. मराठी भाषेसाठी आमचा लढा सुरूच असून मुंबईत मराठी बोललंच पाहिजे असं ते म्हणाले.
चैत्र नवरात्रीच्या काळात मटन विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी काहीजणांनी केली होती. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "चैत्र नवमीमध्ये आमच्याकडे कोळंबी, मटण नैवेद्य असतो. आता तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादू नका. आमचं मराठमोळ हिंदुत्व आहे. आता आम्हाला काय खायचं? हे सुद्धा तुम्हाला विचारून खायचं का?"























