'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
कोल्हापूरमध्ये 'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं' असे निनावी बॅनर लागले होते. त्यामुळे हे बॅनर कोणाचे आहेत याची चर्चा रंगली होती. या बॅनरवरून आरजे सुमितने इन्स्टा रिल करत खोचक टिप्पणी केली होती.

Satej Patil Tagline for Kolhapur Municipal Corporation: निवडणुकीसाठी हटके कॅम्पिंग करण्यामध्ये आणि सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करण्यामध्ये अग्रेसर असलेले कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आगामी कोल्हापूर विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा जोरदार कॅम्पेन सुरू केलं आहे. कोल्हापूरमध्ये 'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं' असे निनावी बॅनर लागले होते. त्यामुळे हे बॅनर कोणाचे आहेत याची चर्चा रंगली होती. या बॅनरवरून आरजे सुमितने इन्स्टा रिल करत खोचक टिप्पणी केली होती. खरंच आम्ही म्हणतोय तसं होणार का? रस्त्यांची वाट लागलीय, रंकाळ्याचा विषय आहे, पाण्याची बोंबाबोब आहे, ही पतंगबाजी आहे अशी टिप्पणी रिलमधून केली होती. मात्र, नंतर हे कॅम्पेन सतेज पाटील यांच्याकडून असल्याचे त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले. तोपर्यंत व्हायरल बॅनरची चर्चा कोल्हापूरसह सोशल मीडियात सुद्धा होती. तोच मुद्दा पकडत आरजे सुमितने निनावी बॅनरवरून रिल करत खोचक टिप्पणी केली होती.
आपल्या भावनांची मला जाणीव आहे, परंतु..
रिल व्हायरल होताच आमदार सतेज पाटील यांनीही कमेंट आरजे सुमितच्या रिलमध्ये प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या भावनांची मला जाणीव आहे, परंतु बदल घडवण्यासाठी आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी मी एक पाऊल टाकत आहे. आपणही सोबत या. आपण कोल्हापूरकर मिळून हा बदल घडवून दाखवूयात! मी खात्री देतो हे होईल, कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटील यांनी केलेल्या कमेंटला ही बातमी लिहित असताना 3 हजार जणांनी लाईक केलं आहे.
View this post on Instagram
तेच लोक अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत होते
सतेज पाटील यांनी केलेल्या कमेंटनंतर भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी सुद्धा खोचक टिप्पणी केली आहे. त्यांनी आपल्या कमेंटमध्ये म्हटलं आहे की, सुमितजी, कोल्हापूर आणि त्याच्या विकासाबाबत आपण मांडत असलेले विचार मी नेहमी लक्षपूर्वक पाहतो. मात्र एक प्रश्न मनात येतो, ज्या लोकांनी हा टॅगलाईन दिला आहे, तेच लोक अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत होते. त्या काळात कोल्हापूरच्या अपेक्षित विकासासाठी ते का अपयशी ठरले? आज देशात जनतेचा विश्वास आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत आणि आता जिल्ह्यापर्यंत. हा विश्वास केवळ शब्दांवर नाही, तर कामगिरीवर आधारित आहे. कोल्हापूरसाठी खरा आणि सकारात्मक बदल हवा असेल, तर देश व राज्य चालवणाऱ्या नेतृत्वाच्या पाठिंब्याने काम करणाऱ्या उमेदवारांना संधी देणे आवश्यक आहे. अशा नेतृत्वाखाली काम करणारे लोक नक्कीच प्रामाणिकपणे मेहनत घेतील आणि जनतेच्या हिताचे ठोस परिणाम देतील, याची मला पूर्ण खात्री आहे. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास, माझ्याशी संपर्क साधावा. कृष्णराज महाडिक यांच्या कमेंटला ही बातमी लिहित असताना 914 जणांनी लाईक केलं आहे.
दुसरीकडे, आरजे सुमितच्या व्हायरल रिलवर संमिश्र तसेच खोचक प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. मतदान करताना शेवटी दारूची बाटली, जेवणं आणि कोणाचं पाकीट यावरच मतदान होणार.. मग कश्याला चांगले रस्ते, स्वच्छ पाणी आणि चांगल्या सुविधा मिळत्यात?? अशी विचारणा एकाने केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















