(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ट्रेनच्या शौचालयामध्ये प्रसुती, पालघरमध्ये धावत्या ट्रेनमध्ये महिलेने बाळाला जन्म दिला!
पालघरमध्ये एका गर्भवती महिलेने धावत्या ट्रेनमध्ये बाळाला जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुरक्षित आणि सुखरुप आहेत.
पालघर : वांद्रे-गाजिपूर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेने धावत्या ट्रेनमध्ये बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. वांद्रे-गाजिपूर डाऊन ट्रेनच्या एस 12 डब्यात ही प्रसुती झाली. गुडिया विश्वकर्मा असं बाळाला जन्म दिलेल्या महिलेचं नाव आहे. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुरक्षित आणि सुखरुप असून त्यांना सोमवारी (2 नोव्हेंबर) डिस्चार्ज देण्यात आला.
राजेश विश्वकर्मा हे त्यांची गर्भवती पत्नी गुडिया आणि पाच वर्षीय मुलीसह रविवारी (1 नोव्हेंबर) रात्री वांद्रे-गाजिपूर या कोविड विशेष ट्रेनमधून उत्तर प्रदेश येथील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. वांद्रे येथून गाडी सुटल्यानंतर विरार स्थानकात येताच गुडिया यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या. गुडिया विश्वकर्मा यांना वेदना सुरु झाल्यानंतर त्यांनी थेट ट्रेनच्या शौचालयामध्ये जाऊन बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केला. राजेश विश्वकर्मा यांनी याची माहिती टीटीईला दिली. त्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करुन याबाबत कळवलं. गाडी पालघर स्टेशनला येता येता महिलेची प्रसुती झाली. तिने गोंडस मुलाला जन्म दिला.
पश्चिम रेल्वे प्रशासनाला ही बाब कळाल्यानंतर त्यांनी या रेल्वेला पालघर येथे थांबा देण्याचे निश्चित केले आणि रात्री 12.30 च्या सुमारास ट्रेन पालघर स्थानकावर थांबवण्यात आली.
त्याआधी पालघर रेल्वे स्थानक प्रशासनाने बालरोग तज्ज्ञ आणि स्त्री रोगतज्ज्ञ यांना पाचारण केले. वैशाली नर्सिंग होमचे डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी या ट्रेनमधील महिलेच्या प्रसूत झालेल्या बाळाला प्रसुतीनंतरची प्रक्रिया पूर्ण करत महिलेसह बाळाला आपल्या दवाखान्यात दाखल केले. यावेळी रुग्णवाहिका ही सज्ज होती. डॉ. राजेंद्र चव्हाण यांनी औदार्य दाखवत या महिलेकडून एकही रुपया न घेता पुढील सर्व उपचार आपल्या दवाखान्यात केले.
लॉकडाऊननंतर ट्रेनमधील ही पहिलीच प्रसुती आहे.