मुंबईतील 29 वर्षीय तरुण लढतोय दुर्धर आजाराशी, स्टेम सेल डोनरची गरज
मुंबईतील 29 वर्षीय विपुल नामक तरुणाला ब्लड कॅन्सरमधील मायलोफायब्रोसिस नावाचा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले आहे. विपुलला आताच्या घडीला ब्लड स्टेम सेल डोनरची आत्यंतिक गरज आहे.
मुंबई : ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लांट हा ब्लड कॅन्सरचा आजार असलेल्या रुग्णांसाठी एकमेव पर्याय असतो. यामुळे या रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे सांगितले जाते. मुंबईतील 29 वर्षीय विपुल नामक तरुणाला ब्लड कॅन्सरमधील मायलोफायब्रोसिस नावाचा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले आहे. विपुलला आताच्या घडीला ब्लड स्टेम सेल डोनरची आत्यंतिक गरज आहे.
हसऱ्या, खेळकर स्वभावाच्या तरुणाला कम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये करिअर करायचे आहे. पोटात दुखायला लागले आणि काही टेस्ट केल्यानंतर मार्च महिन्यात कॅन्सरमधील दुर्मिळ आजार असलेल्या मायलोफायब्रोसिसचे निदान त्याला झाले, हे समजल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यानंतर आपल्या हातात फक्त दोन वर्षांचा कालावधी डाॅक्टरने दिल्यानंतर काय करावं हे विपुलला सुचेना. अशात ब्लड कॅन्सरवर सुद्धा आपण मात देऊ शकतो हे त्याला समजले. पर्याय होता ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लांटचा. यातून आशेचा किरण दिसला. ह्यामुळे त्याला नवसंजीवनी मिळणार होती. मात्र भारतात स्टेम सेलची बॅंकच उपलब्ध नसल्याने आणि कॅन्सरबाबत आपल्याकडे जनजागृती नसल्याने त्याने एक अभियान उभे केले आहे.
आपल्या रक्तातून स्टेम सेल वेगळे केले की एकाला नवसंजीवनी मिळू शकते. मात्र, अशातच जनजागृतीचा अभाव भारतात ब्लड कॅन्सरबद्दल बघायला मिळतो आहे. ब्लड कॅन्सर झाला आहे म्ह टल्यावर अनेक जण तसेच गळून पडतात. विपुलला मायलोफायब्रोसिसचे निदान झाल्यावर त्याच्या अनेक मित्रांनी पुढे येत स्टेम सेल बॅंकचा डाटा बनवण्यासाठी त्याला मदत केली. अनेकांनी ह्यासाठी स्वतःचे सॅम्पल देखील दिले. त्यामुळे आतापर्यंत एक हजार जणांचा डाटा जमवण्यात त्यांना यश मिळाले आहे. ह्या डाटामुळे कॅन्सर, सिकल सेल आणि दुसऱ्या दुर्धर आजारांना तोंड देणाऱ्यांना मदत होणार आहे.
डीकेएमएस बीएमएसटी फाऊंडेशन ऑफ इंडिया नावाची संघटना काम करते. या संस्थेकडून हे अभियान चालवले जात आहे. यामध्ये आपण नोंदणी करून एखाद्याच्या जीवाचे रक्षण करू शकतो. विपुलसाठी मॅचिंग डोनरचा शोध सुरु आहे. ग्लोबल डेटाबेसमध्ये यासंदर्भात शोध घेण्यात आला मात्र तिथे अद्याप परफेक्ट मॅच मिळत नाही आहे. त्यामुळे अधिकाधिक भारतीयांनी यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही dkms-bmst.org/Vipul या लिंकवर नोंदणी करुन अनेकांचे प्राण वाचवू शकता.
विपुलची स्थिची गंभीर आहे. त्याच्याकडे फारसा वेळ उरलेला नाही आणि त्याचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. मात्र ह्या आजारावर मात करायची आणि अनेकांना ह्या आजारावर मात करायला मदत करायची ह्यासाठी विपुल झटताना बघायला मिळतो आहे. अशातच तुम्ही ब्लड सेल दाता म्हणून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.