(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गणेशोत्सवासाठी कोकणात 2200 बसेस सोडणार, 16 जुलैपासून आरक्षण सुरु; परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे.
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. त्यामुळे या नागकांसाठी विशेष ट्रेन्स आणि बस गणेशोत्सवादरम्यान सोडल्या जातात. यावर्षीही गणपती उत्सवासाठी कोकणात राज्य परिवहन महामंडळाच्या 2200 बसेस सोडणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.
गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांना 2200 बसेस सोडल्या जाणार असून त्यासाठी 16 जुलैपासून आरक्षण सुरु होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून 4 सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे.
त्यानंतर 14 सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. 16 जुलै 2021 पासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
रेल्वेक़डूनही स्पेशल ट्रेन्सची सोय
1. मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी-मुंबई सीएसएमटी (आरक्षित)
मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी पूर्ण आरक्षित स्पेशल ट्रेन 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान दररोज चालवली जाईल. रात्री 12.20 मिनिटांनी ही ट्रेन मुंबई सीएसएमटी येथून रवाना होईल आणि त्याच दिवशी दुपारी 2 वाजता ही ट्रेन सावंतवाडी येथे पोहचेल. त्यानंतर ही ट्रेन सावंतवाडी येथून 2.20 वाजता रवाना होईल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे 4.35 वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहचेल. मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.
2. मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी-मुंबई सीएसएमटी (पूर्णपणे आरक्षित)
मुंबई सीएसएमटी- रत्नागिरी स्पेशल ट्रेन 6 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईहून दर सोमवारी आणि शुक्रवार चालवली जाईल. मुंबई सीएसएमटी स्थानकातून दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी ही ट्रेन सुटेल. त्याचदिवशी रात्री ही गाडी 10.35 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. त्यानंतर रत्नागिरीहून पुन्हा ही गाडी 11.30 वाजता मुंबई सीएसएमटीसाठी रवाना होईल. जी दुसऱ्या दिवशी 8.20 वाजता पोहचेल. रत्नागिरीहून दर रविवारी आणि गुरुवार 9 ते 23 सप्टेंबर दरम्यान ही ट्रेन चालवली जाईल.
मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी-मुंबई सीएसएमटी ही गाडी संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावर्दा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि दादर स्थानकांवर थांबेल. मुंबईहून सुटणारी गाडी मागील सर्व स्थानकांवर थांबेल आणि ठाणे स्थानकात अतिरिक्त थांबा असेल.
3. पनवेल - सावंतवाडी रोड - पनवेल (पूर्णपणे आरक्षित)
पनवेल - सावंतवाडी स्पेशल दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी 07 ते 22 सप्टेंबर दरम्यान पनवेल येथून सकाळी 8 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी सावंतवाडी रोडला रात्री 8 वाजता पोहोचेल. सावंतवाडी-पनवेल स्पेशल ट्रेन सावंतवाडी रोड येथून दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी रात्री 8.45 वाजता सुटेल दुसर्या दिवशी सकाळी 7.10 वाजता गाडी पनवेलला पोहोचेल. पनवेल-सावंतवाडी रोड-पनवेल ट्रेन रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.
4. पनवेल-रत्नागिरी-पनवेल (पूर्णपणे आरक्षित)
पनवेल - रत्नागिरी स्पेशल ट्रेन पनवेल येथून 9 ते 23 सप्टेंबर दरम्यान दर गुरुवार आणि रविवारी सकाळी 8 वाजता सुटेल. त्याच दिवशी गाडी 3.40 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरी - पनवेल गाडी 6 ते 20 सप्टेंबर दरम्यान दर सोमवारी व शुक्रवारी रात्री 11.30 वाजता रत्नागिरीहून सुटेल. दुसर्या दिवशी सकाळी 6 वाजता ही गाडी पनवेलला पोहोचेल. पनवेल-रत्नागिरी-पनवेल ही विशेष गाडी रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबेल.
वरील गाड्यांच्या सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. वरील सर्व प्रवासी गाड्यांसाठी बुकिंग सुरु आहे. Passenger Reservation System (PRS) काऊंटर आणि IRCTC च्या वेबसाईटवर ही बुकिंग होणार आहे.