Babanrao Taywade On Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची उंची आहे का?, कोण कोणाला पाडतं दाखवून देऊ; बबनराव तायवाडेंच्या टीकेची तोफ धडाडली
Babanrao Taywade On Manoj Jarange Patil: मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल होतेय, असा आरोपही बबनराव तायवाडे यांनी केला.
Babanrao Taywade On Manoj Jarange Patil नागपूर- मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनापूर्वी आणि आंदोलननंतर किती कुणबी नोंदी झाल्या, हे सरकारने श्वेतपत्र काढून जाहीर करावे, अशी मागणी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे. तसेच मराठा आणि ओबीसी समाजाची दिशाभूल होतेय, असा आरोपही बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी केला.
मनोज जरांगे दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवर खालच्या स्तरावर भाषा वापरतात, त्यांची उंची आहे का?, मनोज जरांगे ओबीसी नेत्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा करतात, अशी टीकाही बबनराव तायवाडे यांनी केली. आगामी निवडणुकीत कोण कोणाला पाडतं, ते आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही बबनराव तायवाडे यांनी दिला. तसेच लक्ष्मण हाके यांचे अभिनंदन...संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकवटला गेला आहे, असंही बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
पंकजा मुंडेंच्या ट्विटवर तायवाडे म्हणाले...
पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी दिवसभरात काही ट्विट करुन लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला भक्कमपणे पाठिंबा दिला होता. लक्ष्मण हाके यांनी आंदोलन कसे करायचे असते, हे दाखवून दिले, असे कौतुकही पंकजा यांनी केले होते. याबाबत बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, महाराष्ट्राला माहीत आहे की ओबीसी समाजच्या उत्थानासाठी आम्ही आंदोलने करीत असतो. आमचे सर्व प्रश्न संविधानिक ,आमच्या संघटनेने 48 जीआर काढले आहेत, सरकार सोबत चर्चा करतो, मुद्दे मांडतो, आमच्याबाबतही कोणी बोलावे,ट्विट करावे, असे तायवाडे यांनी म्हटले. भारतीय राज्यघटनेनुसार 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. त्यामुळे 1992 मध्ये न्यायालयाने घालून दिलेली मर्यादा काढून टाकावी आणि लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण द्यावे, अशी मागणी बबनराव तायवाडे यांनी केली.
निवडणूक लढवण्यावर मनोज जरांगे काय बोलले?
राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्यासाठी आमचे सर्वेक्षण सुरु आहे. एकूण सहा टप्प्यात हे सर्वेक्षण होईल. त्यानंतर 288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन कोणत्या जागांवर ताकदीने निवडणूक लढवायची, हे निश्चित केले जाईल. आतापर्यंत आम्ही विधानसभेच्या 127 जागांची चाचपणी केल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
मराठा नेत्यांनीही समाजाच्या सभांना आलं पाहिजे- मनोज जरांगे
मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा समाजाच्या नेत्यांनाही इशारा दिला. विरोधी लोक बोंबलत आहेत, मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यांचा नेता बोंबलत आहे. मराठ्यांनी मतं देऊनही ते तुमच्या छाताडावर पाय देत आहेत. तुम्ही मतदान करुनही त्यांना जातीचा इतका स्वाभिमान असेल तर मग तुम्हाला का नसावा?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांना विचारला. त्यांचे नेते त्यांच्या समाजाच्या आंदोलनात जात असतील तर आता मराठा नेत्यांनीही समाजाच्या सभांना, बैठकांना आलं पाहिजे. आम्हीही आमच्या जातीच्या मोर्चात जाऊ, असे मराठा नेत्यांनी सांगितले पाहिजे. अन्यथा या नेत्यांनाही निवडणुकीत मराठा समाज पाडेल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.
आणखी वाचा