Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: आझाद मैदानात भलामोठा मंडप, गाड्या पोलिसांनी काढल्या; कोर्टाच्या निर्देशानंतर काय काय घडलं?
Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: आझाद मैदान सोडून सीएसएमटी,मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत.

Manoj Jarange Patil Azad Maidan Morcha: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय. त्यामुळे मुंबई आज (2 सप्टेंबर) दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत. ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरुप आलंय. त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडू नका असे निर्देश कोर्टानं दिलेत. तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी,मरीन ड्राईव्ह, हुतात्मा चौक आणि दक्षिण मुंबईतील इतर भागातून आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत.
आझाद मैदानात जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र न्यायालयाने आता प्रशासनाला अनेक निर्देश दिले आहेत. अशात आझाद मैदानातच आंदोलक थांबावेत, इतरत्र फिरू नये म्हणून आंदोलनच्या ठिकाणी आणखी मोठा नाव मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे 50 मीटर लांब आणि 20 मीटर रुंद इतका आणि अडीच ते तीन हजार लोक थांबू शकतील इतका मोठा हा मंडप आहे.यामुळे इतरत्र पांगलेले आंदोलक मैदानातच येतील असा विश्वास जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय आंदोलकांवर गंगाधर काळकुटे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
न्यायालयाच्या निर्देशानंतर आज सकाळची परिस्थिती कशी?
न्यायालयाच्या निर्देशानंतर मध्य रात्री मुंबई पोलिसांनी आझाद मैदान परिसरात, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलकांच्या उभ्या गाड्या पोलिसांनी काढायला सुरुवात केली. तसेच हा परिसर पालिकेच्यावतीने स्वच्छ करण्यास हि सुरुवात केली. या आंदोलकांना पोलिसांनी स्पीकरच्या मदतीने आणि प्रत्यक्ष भेटून वाहने मुंबईच्या बाहेर वाशी मार्केटला नेण्यास सांगितली. जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची कालची चौथी रात्र होती. त्यात न्यायालयाने निर्देश दिले असले तरी आंदोलक मात्र या परिसरातून कमी झाले नाही. या चौथ्या रात्री देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर शेकडोच्या संख्येने आंदोलक झोपले होते.
मराठा आरक्षणाबाबत सरकार लवकरच नवा जीआर काढण्याच्या तयारीत-
दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकार लवकरच नवा जीआर काढण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. कुणबी प्रमाणपत्राच्या सुलभतेसाठीही हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगेंना मसुदा दाखवून याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती समोर येतीय. मराठा आंदोलनावर तोडगा काढण्याचा सर्वात मोठा पेच सध्या राज्य सरकारसमोर आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीमुळे पेच निर्माण झालाय. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांच्यात बैठक पार पडली.
























