Zero Shadow Day: शून्य सावली दिवस म्हणजे काय रे भाऊ? तुमच्या शहरात कधी आहे 'तो' खास क्षण; जाणून घ्या एका क्लिकवर
शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. कारण या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटांसाठी सोडून जाते. मात्र अशी घटना नेमकी कधी आणि का होते, हे जाणून घेऊया.
Zero Shadow Day 2024 : शून्य सावली दिवस हा शब्दच कुतूहल निर्माण करणारा आहे. कारण या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटांसाठी सोडून जाते. भौगोलिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोणातून हे अतिशय महत्वाचे शून्य सावली दिवस (Zero Shadow Day) महाराष्ट्रात 3 मे ते 31 मे दरम्यान येणार आहेत. विध्यार्थी आणि नागरिकांनी ह्या भौगोलिक घटनांचा आभ्यास आणि निरीक्षण करावे असे आवाहन खगोल अभ्यासकांनी केले आहे. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अंश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो, म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात.
शून्य सावली दिवस म्हणजे काय?
उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा. पृथ्वीवर दरवर्षी सूर्य 23.5 उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे प्रवास करतो, त्याला आपण उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतो. ह्याच ठिकाणी जेव्हा सूर्याचा कोनिय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते, तिथे शुन्य सावली अनुभवता येते. हा कोण मोठा असल्याने दोन दिवस आपल्याला आपली सावली दुपारी काही क्षण दिसत नाही. सूर्य दर रोज 0. 50 अंश सरकतो. म्हणजेच तो एकाच अक्षवृत्तावर 2 दिवस राहतो, त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग ते नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा ह्या दक्षिण आणि उत्तर सीमा आहेत. 15 ते 22 अक्षांश उत्तर दरम्यान जी-जी शहरे येतात तिथे 3 मे ते 31 मे दरम्यान शून्य सावली दिवस अनुभवता येतो. कोल्हापूर जिल्ह्यातील सावंतवाडी येथे 3 मे रोजी, तर धुळे जिल्ह्यात 31 मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो. भारतातून शेवटी मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून 23.50 अंशावरून कर्कवृत गेले आहे. त्यामुळे शून्य सावलीचा हा शेवटचा भूभाग आहे. भारतात 23.50° अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही.
महाराष्ट्रातील शून्य सावली दिवस कधी?
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात 15.6° अक्षांश ते धुळे जिल्यात 21.98° अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत, त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे, त्यामुळे आपण दुपारी 12 ते 12. 35 ह्या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल. अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलीय.
भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे 6.78 अंश अक्षवृत्तावर 6 एप्रिल आणि 5 सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे 10 एप्रिल आणि 1 सप्टेंबर रोजी कन्या कुमारी येथे शून्य सावली दिवस येतो. तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे 2 मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.शेवटी भोपाल जवळ 23.5 अंशावर 18 जून रोजी शून्य सावली दिवस पाहता येतो.लगेच दक्षिणायन सुरु होताच पुन्हा भोपाल ते अंदमान भागापर्यंत पुन्हा पावसाळ्यात शून्य सावली दिवस येतात. परंतु ढग आणि पाउस असल्याने आपल्याला बहुदा हे दिवस अनुभवता येत नाही.
कसा अनुभवावा हा क्षण ?
हा क्षण अनुभवण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. त्यासाठी साहित्य म्हणजे दोन, तीन इंच व्यासाचा आणि एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप, कोणतीही उभी वस्तू ठेवावी किंवा स्वता उन्हात सरळ उभे रहावे. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही. सावलीने थोडा वेळ का होईना साथ सोडलेली असेल. हा एक भौगोलिक, गणितीय आणि वैज्ञानिक प्रयोग आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा प्रयोग अवश्य पहावा, असे आवाहन खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या