(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जीवघेणी पतंगबाजी! बंदी असलेला नायलॉन मांजा घेतोय बळी, नागपुरात 15 दिवसात 5 घटना
नागपुरात नायलॉन मांजा आणि धोकादायक पद्धतीने रस्त्याच्या आणि रेल्वे ट्रेकच्या बाजूला केली जाणारी पतंगबाजी जीवघेणी ठरत आहे.आणखी किती निष्पापांचा बळी नंतर महापालिका आणि पोलीस जागे होतील असा प्रश्न आहे.
नागपूर : बंदी असून ही सर्रास विकला जाणारा नायलॉन मांजा अनेकांसाठी जीवघेणा ठरत आहे. नागपुरात काल एका वीस वर्षीय तरुणाचा भर वाहतुकीत गळा चिरला जाऊन मृत्यू झालाय. प्रणय ठाकरे असं या तरुणाचं नाव आहे. तर गेल्या 15 दिवसात नागपुरात नायलॉन मांजा आणि रस्त्याच्या कडेला केल्या जाणाऱ्या धोकादायक पतंगबाजीमुळे अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहे. महापालिका आणि पोलीस नायलॉन मांजा विरोधात भक्कम कारवाईचा दावा करत असले तरी त्यांचे दावे नुसते शाब्दिक आहे.
वीस वर्षांचा प्रणय ठाकरे. नुकतच त्याने पॉलिटेक्निकचे अभ्यास पूर्ण केले होते. नोकरी मिळवून इलेक्ट्रिशियन असलेल्या वडिलांना मदत करण्यापूर्वीच प्रणयचा नायलॉन मांजामुळे गळा चिरला जाऊन मृत्यू झालाय. बहिणीच्या अॅडमिशनचे कर्तव्य पूर्ण करून प्रणय घराकडे परतत असताना रामबाग आणि जाटतरोडी दरम्यान त्याच्या दुचाकीसमोर नायलॉन मांजा आडवा आला. मांजा त्याच्या हेल्मेटमध्ये अडकला. प्रणय ते काढण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूने मांजा ओढला गेला आणि गळा चिरला जाऊन प्रणयचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवत आरोपीचा शोध सुरु केला आहे. मात्र, अद्याप कोणाचाही शोध लागलेला नाही.
ही नागपुरातली एकमेव घटना नाही. तर 30 नोव्हेंबर रोजी गोधनी रोड वर आदित्य भारद्वाज सकाळी साडे नऊ वाजताच्या बाईकनं कॉम्प्युटर क्लासला जात होता. तेव्हा त्याच्या बाइकसमोर अचानक नॉयलॉन मांजा आडवा आल्याने आदित्यचा चिरला जाऊन तो गंभीर जखमी झाला होता. तसेच दुचाकीवरून खाली कोसळून बराच लांब फरफटत गेल्याने त्याच्या शरीरावर ही अनेक दुखापत झाली होती. रुग्णालयात अनेक दिवस उपचार घेऊन दोनच दिवसांपूर्वी तो घरी परतला आहे. सध्या तो बोलू शकत नाही. मात्र, कोणीही नायलॉन मांजाचा वापर करू नका अशी विनंती त्याच्या वतीने आदित्यच्या कुटुंबीयांनी केली आहे.
5 जानेवारी रोजी जावेद अन्सारी बाईकने जात असताना सदर फ्लायओव्हरवर नायलॉन मांजामुळे त्यांची नाक कापली जाऊन ते जबर जखमी झाले होते. तर मानकापूर फ्लायओव्हर वर शाहिद खान यांचे हेल्मेट मांजामुळे कापले जाऊन गळ्यावर जखमा झाल्या होत्या. 6 जानेवारी रोजी एंटा सोळंकी नावाचा 13 वर्षीय बालक पतंगीच्या मागे धावताना ट्रेनला धडकून त्याचा मृत्यू झाला होता.
त्यामुळे नागपुरात नायलॉन मांजा आणि धोकादायक पद्धतीने रस्त्याच्या आणि रेल्वे ट्रेकच्या बाजूला केली जाणारी पतंगबाजी जीवघेणी ठरत आहे. पोलीस मात्र अशा घटनांबद्दल गंभीर नाही. ज्या इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये प्रणय ठाकरे याच्या मृत्यूचा तपास सुरू आहे. तिथे या घटनेच्या तपासात अत्यंत महत्वाचा ठरू शकेल असा त्याचा हेल्मेट कचऱ्यात फेकलेला आढळला.
नायलॉन मांजावर पूर्णपणे बंदी आहे. तरी तो सर्रास विकला जातो. दरवर्षीच नागपूर सह राज्यात अनेकांचे बळी या नायलॉन मांजामुळे जातात. त्यामुळे नायलॉन मांजा संदर्भात महापालिका, नगरपालिका आणि पोलीस नेमकं करतात तरी काय असा प्रश्न या घटनांमुळे निर्माण होतो. आणखी किती निष्पापांचा बळी नंतर महापालिका आणि पोलीस जागे होतील असा प्रश्न आहे.