Toor Dal Price: तूरडाळीचे भाव पुन्हा गगनाला! शेतकऱ्यांना अच्छे दिन; मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
Maharashtra: तूरडाळीचे भाव सातत्याने वाढत आहेत, याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. मात्र, तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. बाजार समितींमध्ये तुरीला 10 हजार 500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
Yavatmal: शेतकरी आपल्या शेतमालाला भाव मिळावा म्हणून प्रतिक्षेत असतो. असं असतानाच, यवतमाळ बाजार समितीमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून तुरीचे भाव वधारले असून (Toor Dal Price Hike) तूर डाळीला 9 हजार ते 10 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता जादा दर मिळत असल्याचा आनंद दिसत आहे. बाजार समितीमध्ये तूर उत्पादक शेतकरी तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. यवतमाळ बाजार समितीत दररोज तीन ते चार हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत.
खाद्य तेल स्वस्त; तर डाळीच्या किमतींनी दिला झटका
दुसरीकडे मात्र, तूरडाळीचे दर वाढत असल्याचा फटका तूरडाळ खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. नुकतेच खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. अशातच डाळीच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचं घर खर्चाचं बजेट कोलमडलं आहे. डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी ताटातून वरण गायब होण्याची स्थिती आता निर्माण झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या पंधरा दिवसांमध्ये तूर डाळ 15 रुपयांनी महागली आहे. त्यामुळे तूरडाळीचा दर 160 रुपये किलोवर पोहोचला आहे.
डाळीच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारचं पाऊल
केंद्र सरकारने तूर डाळीच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी विशेष पाऊल उचललं आहे, यामुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे डाळींचे भाव घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने किरकोळ विक्रेत्यांसाठी डाळीच्या साठवणीर मर्यादा लागू केली आहे. साठा कमी झाल्यास तूर आणि उडदाचे भाव घसरतील किंवा भाव स्थिर राहू शकतात. आदेशानुसार, तूर आणि उडदाची साठा मर्यादा घाऊक विक्रेत्यांसाठी 200 टन, किरकोळ विक्रेते आणि किरकोळ दुकानदारांसाठी पाच टन आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी डेपोमध्ये 200 टन ठेवण्यात आली आहे. ऑक्टोबरपर्यंत साठ्यावर मर्यादा लागू करण्यात आली आहे.
तूर आणि उडदाचे भाव कडाडले
केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तात्काळ साठवण क्षमतेसंदर्भात आदेश लागू केले आहेत. बेहिशेबी साठेदारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे कडक पाऊल उचललं आहे. तूर डाळीची सरासरी किरकोळ किंमत 19 टक्क्यांनी वाढून 160 रुपये प्रति किलो झाली आहे. एका वर्षापूर्वी ही किंमत 103.25 रुपये प्रति किलो होती.
तूर डाळीचं उत्पादन घटण्याचा अंदाज
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील तूर डाळीचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्यास दर वाढू शकतात. यंदा 2022-23 जुलै-जून या सत्रात तूर उत्पादन 3.43 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी तूर उत्पादन 4.22 दशलक्ष एवढं होतं.
हेही वाचा: