एक्स्प्लोर
सोशल मीडियावर प्रचार; नांदेडच्या 12 व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिन्सना नोटीस
व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन्ससाठी आणि फेसबुकवर राजकीय पोस्ट करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
नांदेड : व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन्ससाठी आणि फेसबुकवर राजकीय पोस्ट करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. हल्लीच्या काळात समाज माध्यमांना प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे विधानसभेच्या रणधुमाळीत मैदानातील प्रचाराबरोबर समाज माध्यमांतील प्रचारदेखील अत्यंत महत्वाचा बनला आहे. परंतु हाच प्रचार आता अनेकांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक व्हॉट्सअॅप अॅडमिन्सना निवडणूक आयोगाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.
समाजमाध्यमांद्वारे केवळ एका क्लिकवर शेकडो लोकांपर्यंत पोहोचता येते. त्यामुळे अनेक उमेदवार या निवडणुकीत समाजमाध्यमांचा अत्यंत खुबीने वापर करत आहेत. अमुक व्यक्तीला विजयी करा, तमुक व्यक्तीला मतदान करु नका, अमुक उमेदवार किती चांगला आहे, तमुक उमेदवार कसा वाईट आहे अशा आशयाच्या अनेक पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहेत. नांदेड जिल्ह्यात अशा प्रकारचा प्रचार करणाऱ्या 12 व्हॉट्स अॅप ग्रुप अॅडमिन्सना पुराव्यानिशी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे ग्रुपमधील अॅडमिन नसलेल्या सदस्याने पोस्ट टाकली असेल तरीदेखील अॅडमिनला नोटिसा पाठवण्यात येत आहेत.
निवडणूक आयोगाने लोकांना तक्रारी करण्यासाठी सी व्हिजिल हे अॅप उपलब्ध करून दिले आहे. या अॅपवर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडू लागला आहे. या अॅपवर विविध प्रकारच्या 1200 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे यातील निम्म्याहून अधिक तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे.
आचारसंहिता भंगाच्या राज्यातील सर्वाधिक 188 तक्रारी वाशीम जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यापाठोपाठ सोलापूर 165, ठाणे 140, पुणे 138 या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement