एक्स्प्लोर
Advertisement
पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या नव्या पर्वाला सुरुवात
राज्यभरात आज मध्यरात्रीपासून पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण खेर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली. यंदा अनोख्या पद्धतीने या स्पर्धेच्या कामांना सुरुवात करण्यात आली असून, 536 गावांमधील जवळपास एक लाख लोक श्रमदानात सहभागी झाले.
यंदा पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांच्या 75 तालुक्यांमधील 4 हजार गावं सहभागी झाले आहेत.
आमीर खान यांनी पानी फाऊंडेशनची स्थापना केली आणि लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन कसे करावे याचे शिक्षण सुरु झाले. महाराष्ट्र सगळा या अभिनव उपक्रमाचा साक्षीदार होण्यासाठी प्रयत्न करु लागला.आपलं गाव पाणीदार व्हावं, आपल्या परिसरातील पाणी आपल्याच भागात मुरावं, वाहणाऱ्या पाण्याचं आणि मातीचं नियोजन करुन ते आडवण्याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारे तरुण महाराष्ट्रात आज तुफान मनात घेऊन गावोगावी काम करु लागली आहेत.
आमीर खानकडून शुभेच्छा
राज्यभरात आज मध्यरात्रीपासून पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय स्पर्धेत सहभागी गावांना भेट देण्याचं आश्वासनही आमीरनं दिलं आहे.
सांगली
आज मध्यरात्री 12 चा ठोका पडताच सांगलीच्या बोरगाव गावानं गावातील जलसंधारणाच्या कामांचा शुभारंभ केला. सांगली जिल्ह्यातल्या इतर अनेक गावांनीही या स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेतला आहे. हातात टिकाव आणि खोरं घेत ढोल ताशाच्या तालावर बोरगावमधली मंडळी मध्यरात्रीच माळरानावर पोहोचली. आणि ‘तुफान आलंया’ म्हणत कामाला सुरुवात केली. यावेळी पानी फाऊंडेशनची टीम देखील हजर होती.
वर्धा
वॉटर कप स्पर्धेत गेल्या वर्षी महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील काकडदरा गावाला मिळाला होता. त्यामुळे यंदाही वर्धा जिल्ह्यातून अनेक गावं स्पर्धेत सहभागी झाली आहेत. आर्वी तालुक्यातील परसोडी, टेंभरी आणि सेलु तालुक्यातील खढकामध्ये रात्री दीड वाजेपर्यंत ग्रामस्थांनी श्रमदान केलं. यात वैद्यकिय जनजागृती मंच, बहार नेचर फाऊंडेशन या संघटनांनीही सहभाग घेतला. जिल्ह्यातून 4 तालुक्यांनी स्पर्धेत सहभाग घेतलाय. यात सेलू, देवळी, कारंजा आणि आर्वी तालुक्याचा समावेश आहे.
जळगाव
तिकडे जळगाव जिल्ह्यातही वॉटर कप स्पर्धेचा उत्साह पाहायला मिळतो आहे. अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. अमळनेर तालुक्यातील नागाव खुर्द या गावात मध्यरात्री मशाल रॅली काढून ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामाचा श्रीगणेशा केला. यावेळी जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरही उपस्थित होते. महिला, तरुण, वृद्धांनीही श्रमदानात सहभाग नोंदवला
सातारा
तिकडे सातारा जिल्ह्यातील गावंही वॉटर कप स्पर्धेत उत्साहानं सहभागी झाली आहेत. कोरेगाव तालुक्यातील नागझरी गावात मध्यरात्री ग्रामस्थांनी श्रमदान केलं. यावेळी कुदळ ,फावडे या श्रमदानासाठी लागणाऱ्या साहित्यांची संपुर्ण गावातून मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीबरोबरच पाणी अडवा, पाणी जिरवाच्या घोषणाही देण्यात आल्या.
वाशिम
मंगरुळपीर तालुक्यातील लखमापूर येथे मध्यरात्री 12 वाजता वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या उपस्थितीत श्रमदानास सुरुवात झाली. स्पर्धा सुरु होताच पहिल्या मिनिटपासूनच म्हणजेच मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून सुमारे 300 लोकसंख्या असलेल्या लखमापूर गावातील सर्व महिला, पुरुष श्रमदानामध्ये सहभागी होत कामाला सुरुवात केली आहे.
अंधारामध्ये मशाली पटवून, पारंपारिक गीत, भजन म्हणत ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात टिकास, फावडे हाती घेऊन सीसीटी, माती बांधाचे कामे सुरू केली. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा यावेळी श्रमदान करुन ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे हातात टिकाव घेऊन श्रमदान करत असल्याचे पाहून ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणीत झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच या स्पर्धेत गावाला राज्यस्तरावरील बक्षीस मिळवून देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी असेच एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
लातूर
लातूर जिल्ह्यातील 171 गावांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यात औसा तालुक्यातील 63, देवणी तालुक्यातील 54 आणि निलंगा तालुक्यातील 54 गावांचा समावेश आहे. आज आठ तारखेला मध्यरात्री बारा वाजल्यापासून कामाला सुरुवात झाली आहे. 8 एप्रिल ते 22 मे हा कालावधी ठेवण्यात आला आहे. अशीच सुरुवात औसा तालुक्यातील कुमठा जेवरी सारख्या गावातही झाली आहे. वाजतगाजत, फटाक्यांच्या आतषबाजी आणि मशालफेरी काढून कामाला सुरुवात झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक खेड्यातून लोकजागर घुमू लागला आहे. अनेक गावांनी पाण्यासाठी तरुणांची फळी उभा केली आहे. गावोगाव मशालफेरी काढल्या जात आहेत. प्रशिक्षित तरुणांची फळी उत्स्फूर्तपणे या चळवळीला गती देत आहे. प्रशासन मोठ्या प्रमाणात सहभागी होताना दिसत आहे. आज गावोगावी खोऱ्या, टिकाव, टोपल्यांची चर्चा सुरु झाली आहे. रोपवाटिका सज्ज होताना दिसत आहेत, शोषखड्डे गावकरी स्वतः सहभाग घेऊन खोदताना दिसत आहेत.
शिवारफेरी, माती परीक्षण, अनेक उपचार पद्धती, पाणी बचतीच तंत्रज्ञान शिकवलं जात आहे. सीसीटी, डीप सीसीटी, कंपार्टमेंट बंडीग, कंटुर बंडीग, इन लेट, आऊट लेट शेततळे, प्लॅस्टिकयुक्त शेततळे, छोटे मातीचे धरण, अनघड दगडी बांध, गबियन बंधारा,सिमेंट बंधारा, नाला रुंदीकरण, खोलीकरण, पाणीसाठ्यातील गाळ काढणे इत्यादी कामांना येत्या महिनाभरात गती मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement