वर्ध्यातील सिंदी रेल्वे स्थानकावरील रेल रोको आंदोलनाला यश, दोन थांबे देण्याचे प्रशासनाकडून आश्वासन
Wardha News Update : वर्ध्यातील सिंदी रेल्वे स्थानकावरील रेल रोको आंदोलनाला यश मिळाले आहे. दोन थांबे देण्याचे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
Wardha News Update : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात 17 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या सिंदी रेल्वे येथील रेल रोको आंदोलनाला यश आले आहे. सिंदी येथे 15 पैकी दोन गाड्यांचे थांबे देण्याचे प्रशानाकडून लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
दोन मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. परंतु, दोन गाड्या सुरू करून आमचा त्रास कमी होणार नसून कोरोनाच्या आधी थांबणाऱ्या सर्व गाड्यांचे थांबे देण्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते पुढेही आंदोलन छेडण्याची शक्यता आहे.
कोरोना काळापूर्वी थांबणाऱ्या 15 गाड्याचे थांबे सिंदी स्थानकावर सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी रेटून धरली. आंदोलकांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली. तोंडी नाही तर लेखी आश्वासन द्या, या पवित्र्यावर मोर्चेकरी ठाम होते. यावेळी सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यासमोर आणि रेल्वे स्थानकात रेलरोको करण्यासाठी जाणाऱ्या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी बॅरिकेट्स लावून थांबवले. त्यानंतर काही गावकरी, आरपीएफ आणि वर्धा पोलीस अधिकाऱ्यांनी अर्धा तास सकारात्मक चर्चा केली. या चर्चेतून दोन रेल्वे गाड्यांचे थांबे सिंदी येथे देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.
सिंदी शहरासह आजूबाजूच्या चाळीस गावातील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. हजारोंच्या संख्येने मुख्य बाजारातील महादेव मंदिरासमोरून रेल्वे ट्रॅकवर निघालेल्या मोर्चेकऱ्यांचे तीव्र आणि आक्रमक रूप बघून रेल्वे विभागाचे अधिकारी आशुतोष पांडे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यानंतर गावकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. पंधरा गाड्यांच्या थांब्यापैकी दोन रेल्वेगाड्यांचे थांबे तत्काळ देण्यात येतील असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी माघार घेतली.
यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे स्टेशन परिसरात लावण्यात आला होता. सिंदी रेल्वे स्टेशन हे मध्य भारतातील महत्त्वाचं स्टेशन आहे. या थांब्यावर पूर्व आणि दक्षिण विभागात जाणाऱ्या गाड्या कोरोनाआधी थांबत होत्या. कोरोनामुळे या स्थानकावरील थांबा बंद करण्यात आला होता. परंतु, आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे या 15 रेल्वेगाड्यांचे थांबे पूर्ववत करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यायंनी केली आहे.
रेल्वेचे थांबे बंद असल्यामुळे गावकरी आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गाड्यांचे थांबे मिळविण्यासाठी अनेक वेळा गावकऱ्यांनी पाठपुरावा केला. मात्र, गावकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला.