'दावोस दौरा म्हणजे खोदा पहाड़ निकला चूहा...'; विजय वडेट्टीवारांची सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar : ज्याची पाच कोटीची लिमेट नाही, त्याच्या नावावर हजारो कोटीची गुंतवणूक मागच्यावेळी केलेल्या दावोस दौऱ्यात दाखवली.
मुंबई : दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जात आहे. यावरून आता विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. 'दावोस दौरा म्हणजे 'खोदा पहाड़ निकला चूहा' असा होणार असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) सरकारवर टीका केली आहे.
याबाबत बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “महाराष्ट्र पाहणार आहे की, 'खोदा पहाड़ निकला चूहा', मागच्या वेळी देखील असेच झाले होते. डोंगर खोदायला गेले आणि उंदीर घेऊन आले. ज्याची पाच कोटीची लिमेट नाही, त्याच्या नावावर हजारो कोटीची गुंतवणूक मागच्या वेळी केलेल्या दावोस दौऱ्यात दाखवली. ज्या विदेशी कंपन्या म्हणून दाखवल्या, त्या भारतीय कंपन्या निघाल्या. अशी बनवाबनवी आणि बोगसगिरी कशासाठी, महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजून अशाप्रकारे हे सरकार वागत असेल आणि हे वऱ्हाड घेऊन गेले असेल, सरकारच्या तिजोरीतल पैश्यांवर पर्यटन करत असतील तर हे महाराष्ट्राचे दुर्देव असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
कुटुंबातील मंडळींच्या पर्यटनासाठी दौरा?
विशेष म्हणजे याबाबत वडेट्टीवार यांनी ट्वीट करत देखील सरकारवर निशाणा साधला आहे.“50 लोकांचा ताफा सोबतीला आणि त्यांचा 34 कोटींचा खर्च करून राज्याचे मुख्यमंत्री दावोसला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. इतकं करून ही गुंतवणूक महाराष्ट्रात येणार का? की केंद्रात बसलेल्या महाशक्तीच्या ताकदीने गुजरात मध्ये जाणार?, महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत तिथे राज्याचे हिताचे किती कामे होतील?, दौऱ्याचा एकूण खर्च बघता हा दावोस दौरा सरकारच्या मर्जीतील अधिकारी, नेते आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळींच्या पर्यटनासाठी आहे का? हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे,”वडेट्टीवार म्हणाले.
जयंत पाटलांची टीका...
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील दावोस दौऱ्यावरून टीका केली आहे.“38 कोटी रुपये या दौऱ्यावर खर्च होणार असल्याचे मी ऐकले आहे. मला वाटते तिथे स्टॉल लावण्यात येणार असून, तिथपर्यंत मी समजू शकतो. परंतु, येथून तिकडे जाणाऱ्या लोकांना सुरक्षा पुरवण्यापर्यंत सगळ्या सोयी करणं हे अनाकलनीय आहे. आता बेसुमार खर्च करण्याच्या पद्धती सुरु झाल्या आहेत, आणि हेच आता चालले असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौरा सध्या चर्चेचा विषय बनला असून, यावरून त्यांच्यावर विरोधक मोठ्या प्रमाणात टीका करतांना पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: