मोठी बातमी : मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं; दाट धुक्यामुळे मुंबईकरांच्या लाईफलाईनवर परिणाम, रेल्वे वाहतूक मंदावली
Central Railway : मुंबईकरांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी. मध्य रेल्वेची वाहतूक आज उशिरानं होत आहे. कर्जत, कसारा परिसरात धुक्याची चादर पसरल्याने याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.
मुंबई : दाट धुक्याची चादर तयार झाल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील कसारा, खोपोली, कर्जत ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकल शनिवारी सकाळी अर्धा तास उशिराने धावत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. लोकल चालवताना मोटरमनला पाच फुटाच्या पलीकडील दिसत नाही. त्यामुळे दिवे लावून भोंगा वाजवत मोटरमन संथ गतीने लोकल चालवत असल्याचं दृश्य आहे. कर्जत, कसारा परिसरात धुक्याची चादर पसरली आहे, याचाच परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.
शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
आजपासून दोन दिवस गर्डर लाँचिंगचं काम करण्यात येणार आहे. विविध पुलांच्या गर्डर लाँचिंगसाठी शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही मेल/ एक्स्प्रेसचे मार्ग बदलले जाणार असून काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
असा असेल ब्लॉक आणि गर्डर लाँचिंग कामे
■ शनिवारी मध्यरात्री 1 ते रविवारी पहाटे 4.30
■ ठाकुर्ली आणि कल्याण स्टेशन दरम्यान तिसरा पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी)
■ उल्हासनगरमध्ये 12 मीटर रुंद फूट ओव्हर ब्रिज
■ कल्याण आणि अंबरनाथ दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेटऐवजी ओव्हर ब्रिज
■ नेरळमध्ये 6 मीटर रुंद फ्लायओव्हर
■ रविवारी मध्यरात्री 2 ते सोमवारी पहाटे 5.30 पर्यंत
■ ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकांदरम्यान तिसरा नवीन पत्रीपूल रोड ओव्हर ब्रिज
विविध अभियांत्रिकी कामे
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी, सिग्नालिंग आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे.
सकाळी 9.34 ते दुपारी 3.40 वाजता ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान - जलद लोकल डाऊन धिम्या मार्गावर वळविल्या जातील.
कळवा, मुंब्रा आणि दिवा ३ स्थानकावर या लोकल थांबतील. तसेच मेल-एक्स्प्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळविल्या जातील.
ट्रान्स हार्बरवर कसा फटका बसणार?
सकाळी 10.35 ते दुपारी 4.10 - ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान - सर्व सेवा रद्द राहतील.
पश्चिम रेल्वे वाहतुकीत काय बदल?
शनिवारी मध्य रात्री 12.30 ते रविवारी पहाटे 4 - भाईंदर आणि वसई रोड स्थानकादरम्यान- काही गाड्या रद्द होतील. धिम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हेही वाचा: