फडणवीसांच्या बंगल्यावर खातेवाटप? अजित पवार आरोपांची राळ उडालेल्या धनंजय मुंडेंना स्वत:च्या गाडीतून घेऊन निघाले
Ajit Pawar & Dhananjay Munde : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहे.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी (दि. 15) पार पडला. मंत्रिमंडळाच्या शपथविधीला एक आठवडा उलटला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. एकीकडे हिवाळी अधिवेशन संपत आले असून खातेवाटप नेमके अडले कुठे? याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील रामगिरी बंगल्यावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विधानसभा आणि विधानपरिषदेतील सर्वच आमदारांना चहापानसाठी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आजच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहे. यावरून विरोधकांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. मात्र, धनंजय मुंडे यांना अजित पवार स्वतःच्या गाडीतून देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी घेऊन गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे असल्याचे म्हटले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला. सरकार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे काम करत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडेंचा प्रवास
वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे माध्यमांपासून दूर होते. काल रात्री उशिरा धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या सर्व प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे, असे त्यांनी म्हटले. वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, आज सकाळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला विजयगड या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर खातेवाटप होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा