(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weather Update : पुढील पाच दिवस विदर्भाला यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचीही शक्यता
Vidarbha Weather Update : आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यात पावसाचे ढग कायम राहणार असून विदर्भाला यलो अलर्ट नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
Vidarbha Weather Update : हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार विदर्भातील (Vidarbha) बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत एकच दाणादाण उडावली आहे. यात अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, तर अनेकांच्या नाहक बळीही गेला आहे. मात्र अलिकडे पडत असलेला पाऊस हा मान्सून (Monsoon) नसल्याचे नागपूर हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत सलग कोसळत असेलेल्या दमदार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. यात अनेकांच्या घरांवरची छत उडून गेली आहेत, तर अनेक ठिकाणी मोठे झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक आणि विद्युत प्रवाह खंडित झाला आहे.
तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यात पावसाचे ढग कायम राहणार असून सोसाट्याचा वारा आणि ताशी 30-50 किमी वेगाचा वादळी वाऱ्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट
जून हा पावसाचा महिना आहे. मात्र, आता जून महिन्याचा मध्यान्ह लागला असला तरी निम्या विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात मान्सूनचं अजूनही आगमन झालेलं नाही. परिणामी प्रखर उष्णता आणि उन्हाच्या झळा अजूनही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशांच्यावर असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडे ठाक झाले आहेत. तर, विदर्भातील अनेक तलावांच्या पाण्याच्या पातळीनेही अगदी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्यांना देखील आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
अशातच हवामान विभागाने विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 12 जून ते 16 जून दरम्यान विदर्भात विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
50 ते 60 घरांवरील छप्पर उडून गेलेत
यवतमाळ जिल्ह्यात 11 जूनच्या रात्री जोरदार पाऊस बरसला. पुसद, रुंझा, डोंगरखर्डा, कळंब, हिवरी, हिवरी संगम, सवना, महागाव, महागाव कसबा आणि बाभूळगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. नाकापार्डी येथे वादळी पावसाने अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडाली. यात 50 ते 60 घरांवरील छप्पर उडून गेलेत. यात धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी लागवडीसाठी आणलेले बियाणे, खते याचेही नुकसान झाले. नुकसान झालेल्या घरांच्या सर्व्हे करण्यात आला असून आपत्ती विभागाकडून नुकसानीसाठी मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या