Heavy Rain : गटारातील काळ्या पाण्याचा लोंढा वस्तीत शिरला, नागपूर विमानतळाचं प्रवेशद्वार जलमय; स्मार्ट सिटीचा लौकिक धुळीला मिळाला
Vidarbha Rain Update : उपराजधानी नागपूरसह विदर्भात धुव्वाधार पावसाने एकाच दाणादाण उडवली आहे. नागपूर शहरात आज शनिवार 20 जुलैच्या पहाटे 5.30 ते सकाळी 8.30 या तीन तासात 81.8 मिमी पपावसाची नोंद झालीय.
Nagpur News नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) विदर्भाला (Vidarbha) मुसळधार पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: धो-धो धुतलंय. एकट्या नागपूर शहरात आज शनिवार 20 जुलैच्या पहाटे 5.30 ते सकाळी 8.30 या तीन तासात 81.8 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या बाबतची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान (IMD) विभागाने दिली आहे. अवघ्या काही तासांच्या पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत केलं असून नदी नाले दुतर्फा ओसंडून वाहू लागले आहेत. मात्र असेच काहीसे चित्र शहरातील मुख्य रस्त्यांवर देखील बघायला मिळाले आहे.
रस्त्यांना अक्षरक्ष: नदी, नाल्याचे स्वरूप आल्याचे चित्र आहे. अशातच आता स्मार्ट सिटीतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अद्यावत यंत्रणेचीही पोलखोल झाली असून महापालिकेने पावसाळ्यापूर्वी सर्व नाले स्वच्छ केल्याचा दावाही फेल ठरला आहे. तर दुसरीकडे नागपूर विमानतळाचं प्रवेशद्वार जलमय झाल्याने प्रवाशांसाठी विमानतळावर जाण्याचा व बाहेर पडण्याच्या मार्ग पोलिसांनी पूर्णपणे बंद केला आहे. एकुणात या संपूर्ण प्रकारामुळे स्मार्ट सिटीचा लौकिक धुळीला मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
गटारातील काळ्या पाण्याचा लोंढा वस्तीत नागरिकांच्या घरात शिरला
नागपूरच्या भांडेवाडी कचरा डेपो जवळ पावसाच्या पाण्यासह डंपिंग यार्डचा कचरा वाहून बाहेर आला आहे. त्यामुळे डम्पिंग यार्ड जवळच्या सुरज नगर या वस्तीत अनेकांच्या घरी कचऱ्यासह घाणेरडे पाणी शिरले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी सर्व नाले स्वच्छ केल्याचा दावा केला होता. भांडेवाडी कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची अद्यावत यंत्रणा असल्याचा महापालिकेचा नेहमीच दावा असतो. मात्र तीन तासाच्या पावसानं महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेची पोलखोल तर केलीच आहे. तसेच भांडेवाडी कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापन किती निकृष्ट दर्जाचा आहे, त्याचे हे दुर्दैवी उदाहरणच म्हणावा लागेल. अजूनही महापालिकेचे कर्मचारी सुरज नगर परिसरात पोहोचले नाही आहे. त्यामुळे नागरिकांनाच वस्तीत शिरलेला दुर्गंधीयुक्त घाणेरडा पाणी बाहेर काढावे लागत आहे.
स्मार्ट सिटीचा लौकिक धुळीला मिळाला
तर दुसरीकडे, नागपूरच्या तरोडी येथे पंतप्रधान आवास योजनेच्या अनेक इमारती असून त्यामध्ये शेकडो कुटुंब राहतात. आज सकाळपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या संकुलातही पाणी शिरले आहे. परिसरातून वाहणारे नाले ओवर फ्लो होऊन संकुलाच्या परिसरात पाणी शिरले असून बेसमेंट, पार्किंग आणि तळ मजल्यावरील घरांमध्ये पाणी शिरले आहे. परिसरात नालेसफाई आणि नियमित कचरा उचलण्याचे काम महापालिकेकडून करण्यात आले नाही. त्यामुळे तीन ते चार तासांच्या पावसामुळे नाले ओव्हर फ्लो झाले आणि रस्त्यावर तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या संकुलाच्या घरात पाणी शिरल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
अनेक घरांच्या तळमजल्यांमध्ये पाणी
नागपूरच्या वेशीवर वसलेल्या नवीन नरसाळा येथे पुर सदृश स्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील निर्मिती विहार कॉलोनी, चिमूरकर ले आऊट, नवीन नरसाळा या भागात अनेक इमारती आणि घर चारही बाजूने पाण्याने वेढले गेले आहे. इमारतीच्या बेसमेंट आणि पार्किंग मध्ये तसेच घरांच्या तळमजल्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे या घरातील नागरिक अडकल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या गुडघ्याच्या खाल पर्यंत पाण्याची पातळी असली तरी सतत सुरू राहिल्यास परिस्थिती जास्त बिघडू शकते. तर या परिसराला लागुन असलेली पोहरा नदी ही ओसंडून वाहत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या