विदर्भाला मुसळधार पावसानं धो-धो धुतलं! नागपुरात तीन तासात 81.8 मिमी पाऊस; अतिवृष्टीमुळे सर्वत्र दाणादाण
Vidarbha Rain Update : उपराजधानी नागपूरसह विदर्भात धुव्वाधार पावसाने एकाच दाणादाण उडवली आहे. नागपूर शहरात आज शनिवार 20 जुलैच्या पहाटे 5.30 ते सकाळी 8.30 या तीन तासात 81.8 मिमी पपावसाची नोंद झालीय.
Nagpur News नागपूर : गेल्या दोन दिवसापासून उपराजधानी नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain) सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टी सदृश्य पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही विदर्भातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. एकट्या नागपूर शहरात पाहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाले ओढे ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील अनेक भागातील घारत पावसाचे पाणी शिरल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे. परिणामी आज जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र काही तासांच्या पावसाने स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या उपराजधानी नागपूरची दाणादाण झाल्याचे चित्र बघायला मिळात आहे.
नागपुरात तीन तासात 81.8 मिमी पावसाची नोंद
नागपूर शहरात आज शनिवार 20 जुलैच्या पहाटे 5.30 ते सकाळी 8.30 या तीन तासात 81.8 मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या बाबतची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. परिणामी नागपूरच्या भांडेवाडी कचरा डेपो जवळ पावसाच्या पाण्यासह डंपिंग यार्डचा कचरा वाहून बाहेर आला आहे. त्यामुळे डम्पिंग यार्ड जवळच्या सुरज नगर या वस्तीत अनेकांच्या घरी कचऱ्यासह घाणेरडे पाणी शिरले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी सर्व नाले स्वच्छ केल्याचा दावा केला होता.
भांडेवाडी कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची अद्यावत यंत्रणा असल्याचा महापालिकेचा नेहमीच दावा असतो. मात्र तीन तासाच्या पावसानं महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेची पोलखोल तर केलीच आहे. तसेच भांडेवाडी कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापन किती निकृष्ट दर्जाचा आहे, त्याचे हे दुर्दैवी उदाहरणच म्हणावा लागेल. अजूनही महापालिकेचे कर्मचारी सुरज नगर परिसरात पोहोचले नाही आहे. त्यामुळे नागरिकांनाच वस्तीत शिरलेला दुर्गंधीयुक्त घाणेरडा पाणी बाहेर काढावे लागत आहे.
मुख्य रस्त्यांना अक्षराक्ष: नदी-नाल्याचे स्वरूप
नागपूरात आज सकाळी सुमारे तीन तास दमदार पाऊस झाला. त्यामुळे नागपूरच्या अनेक रस्त्यांवर नदीचे स्वरूपात पाणी पाहताना दिसून आले. तर नागपूर शहरात महापालिकेकडून तर नागपूरच्या शेजारी वाडी परिसरात नगर परिषदेकडून भर पावसाळ्यात सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाचे काम सुरू करण्यात आले आहे. या अनयोजित बांधकामामुळे ही अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. वाडी परिसरात ऍटोमिक एनर्जी डेपो रोडवर नगरपालिकेने भर पावसात खोदकाम केल्यामुळे अक्षराक्ष: नदी वाहताना दिसून आली आहे. नागपूरच्या प्रियांकावाडी वस्तीत नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून संपूर्ण वस्तीला तलावाचे स्वरूप आले आहे. याचे खापर नागरिक आता नागपूर महानगर पालिकेवर फोडत आहे.
पावसाचा शेतीला फटका
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात पहाटेपासूनच जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून शेतामध्ये ही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. उमरेड तालुक्यातील पाचगाव परिसरात संत्र्याची बाग असो किंवा सोयाबीनचे शेत सर्वांना तळ्याचे स्वरूप आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या पावसामुळे झाल्याचा प्राथमिक चित्र आहे. सोयाबीनची शेत आणि संत्र्याची बाग पूर्णपणे पाण्याखाली गेली असून एका तळ्याचा स्वरूप या बागेला आलेला आहे. तर तिकडे नागपूरच्या नरेंद्र नगर अंडर पास मध्ये पाणी साचल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. अशात पावसाच्या साचलेल्या पाण्यात पूल पार करण्याच्या प्रयत्नात एक ट्रक पुलाखाली बंद पडला.
इतर महत्वाच्या बातम्या