सोलापुरातील लसीकरण केंद्र ठरतंय उत्तम व्यवस्थापनेचा नमुना; ना गोंधळ, ना रांगा, गरजूंना जाग्यावरच मिळतोय डोस
सोलापुरातील आर्युर्वेदिक महाविद्यालयातील लसीकरण केंद्र सध्या उत्तम व्यवस्थापनेचं उदाहरण झालं आहे. या केंद्रावर गर्दी असूनही ना केंद्रावर रांगा, ना कसला गोंधळ, गरजूंना जाग्यावरच लस दिली जात आहे.
सोलापूर : राज्यभरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रावरील गोंधळाच्या बातम्या आपण आतापर्यंत पाहिल्या आहेत. आता आम्ही सोलापुरातील एक उत्तम व्यवस्थेचा नमुना असलेल्या केंद्राची बातमी दाखवतोय. सोलापुरातील शेठ गोविंदजी रावजी आर्युर्वेद महाविद्यालयात महानगरपालिकेतर्फे लसीकरण करण्यात येत आहे. शहरातील सर्वाधिक लसीकरण होण्याऱ्या केंद्रावर लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने उत्तम व्यवस्था करण्यात येत आहे. या केंद्रावर कोणत्याही नागरिकाला रांगेत उभं राहण्याची गरज नाहीये.
प्रत्येकाला बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेर गावातून आलेल्या नागरिकांसाठी चहा, नाष्ट्याची व्यवस्था देखील या केंद्रावर करण्यात आली आहे. प्रभागातील नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी व्यवस्था करण्यात येतीय. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून उद्योजक असलेले काही नागरिक या केंद्रावर सेवा बजावत आहेत. नागरिकांना नोंदणीसाठी मदत करणे, सोशल डिस्टन्सचे पालन करण्यासठी हे सामाजिक कार्यकर्ते सेवा करत आहेत.
विशेष बाब म्हणजे या केंद्रावर प्राप्त लसींपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतूक केलेल्या केरळ पॅटर्नचा या ठिकाणी अवलंब केला जात असल्याचे दिसत आहे. प्रत्येक व्यक्तीला 10 मिलीचा डोस दिला जातो. मात्र, लसीच्या कुपीत जवळपास 11 ते 12 मिली डोस असतो. व्यवस्थित डोस भरल्याने एकही थेंब वाया जात नाही. त्यामुळे दररोज प्राप्त होणाऱ्या वायल्स पेक्षा अधिक लोकांचे वॅक्सिनेशन या केंद्रावर केले जात आहे. 5 मे रोजी या लसीकरण केंद्रावर 100 डोसेस प्राप्त झाले होते तर 7 लोकांना अतिरिक्त लसीकरण करत एकूण 107 लोकांना लस देण्यात आले. तर 6 मे रोजी 200 लस मिळाले होते मात्र केंद्राने 229 लोकांचे लसीकरण केले. अशाच पद्धतीने 12 मे रोजी 575 लसी मिळाल्या होत्या मात्र केंद्राने योग्य पद्धतीने लसीकरण केल्याने 600 लाभार्थ्यांना लस देण्यात आले.
तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगाना चालण्यास त्रास येतो अशा लोकांना केंद्रात येण्याची सक्ती न करता जाग्यावरच लस उपलब्ध करुन दिली जात आहे. लसीकरण केंद्रावरील या व्यवस्थेमुळे नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केले जात आहे. "प्राप्त होणाऱ्या डोसेसमध्ये काही प्रमाणात अधिकचे लस असते. योग्य पद्धतीने हाताळणी केल्यास अधिकच्या लोकांना याचा फायदा होऊ शकतो. केवळ काळजी घेत योग्य पद्धतीने लसीकरण करणे गरजेचे आहे." असे मत या केंद्राचे प्रमुख डॉ. अविनाश चव्हाण यांनी व्यक्त केले.
"कोरोना हद्दपार करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सुरुवातीला लोकांना घराघरात जाऊन लसीकरणासाठी जनजागृती केली. मात्र, काही केंद्रावर गोंधळ, रांगा लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे केंद्रावर व्यवस्था करण्याचे निश्चित केले. नागरिकांचा बराच वेळ नोंदणी प्रक्रियेसाठी जातो. त्यामुऴे अधिकचे संगणक वापरुन तो वेळ कमी केला आहे. तसेच बाहेरुन येणाऱ्या नागरिकांसाठी चहा पाण्याची व्यवस्था लोकप्रतिनिधी या नात्याने केली आहे." अशी प्रतिक्रिया सोलापूर महानगर पालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली.