पुणे, सोलापूरकरांचा घसा कोरडा; उजनी धरणाने गाठली इतिहासातील सर्वात निच्चांकी पातळी
यंदाच्या भीषण दुष्काळाचे विदारक चित्र पाहायचे असेल तर उजनी धरणावर फेरफटका मारला पाहिजे. कारण, उजनी धरणाने 44 वर्षाच्या इतिहासातील सर्वात निच्चांकी पातळी गाठली
सोलापूर: गतवर्षीच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने यंदाच्या उन्हाळ्यात दुष्काळाची परिस्थिती उद्धभवल्याचं दिसून येत आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या महिला, हाती कळशी घेऊन आईसोबत पाण्यासाठी (Water) दूरदूर जाणारी लहान मुलेही पाहायला मिळत आहेत. गेल्या कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा हे चित्र पाण्याच्या नियोजनाची दाहकता दाखवून देत आहे. पाण्याअभावी धरणं तळ गाठत आहेत, शेतातील विहिरींचं पाणी आटलंय, तर बोर कोरड्या पडल्या आहेत. जनावरांच्या पाण्यासाठीही बळीराजाची भटकंती होत आहे. त्यामुळे, सर्वांनाच मान्सूनच्या आगमनाची उत्सुकत आहे. ग्रामीण भागात 8 ते 10 दिवसांनी पाणीपुरवठा होत असून सोलापूरांचा (Solapur) घसा कोरडा पडला आहे. त्यातच पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी (Ujani) धरणानेही इतिहासातील सर्वात निच्चांकी पातळी गाठली आहे.
यंदाच्या भीषण दुष्काळाचे विदारक चित्र पाहायचे असेल तर उजनी धरणावर फेरफटका मारला पाहिजे. कारण, उजनी धरणाने 44 वर्षाच्या इतिहासातील सर्वात निच्चांकी पातळी गाठली असून जेथे 50 ते 100 फूट पाणी असते, अशा ठिकाणी चक्क मोकळे मैदान झाल्याच दिसून येत आहे. उजनी धरणाची इतकी कोरडी अवस्था यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नव्हती, तेवढी यंदाच्या मे महिन्यात दिसत आहे. यापूर्वी 30 जून 2019 रोजी उजनी धरण वजा 59.05 टक्के इतक्या निच्चांकी पातळीला गेले होते. त्यानंतर पाच वर्षात ही नीचांकी पातळी एक महिना आधीच ओलांडत उजनी धरणाने थेट वजा 59.30 टक्के एवढी निच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे उजनी धरणावरील सर्व यंत्रणा बंद पडल्या असून धरणात आता केवळ वजा 31 टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.
प्रतिक्षा मान्सूनची
उजनी धरणाची क्षमता 100 टक्के भरल्यावर 112 टीएमसी एवढी असून प्रशासनाने धरणात 111 टक्के म्हणजे 123 टीएमसी पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा स्थितीत 1980 साली पाणी भरण्यास सुरुवात झालेल्या या उजनी धरणाने 44 वर्षातील सर्वात निच्चांकी पातळी ओलांडली आहे. यापूर्वी 30 जून 2019 साली जेंव्हा धरण 96 टक्के भरले होते तेंव्हा वजा 59.05 टक्के ही निच्चांकी पातळी गाठली होती. यंदा धरणात केवळ 60 टक्के पाणी असताना एक महिना आधीच त्या निच्चांकी पातळीवर धरणाचा पाणीसाठी पोहोचला आहे. धरणाने निच्चांकी पातळी गाठल्याने अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. त्यामुळे, आता सर्वांच्या नजरा पुढील काही दिवसांत येणाऱ्या मान्सूनकडे लागल्या आहेत. दिलासादायक गोष्ट म्हणजे यंदा हवामान विभागाने 106 टक्के पाऊस असल्याचे सांगत वेळेवर मान्सून सुरु होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणून, पावसाळा लवकर सुरुवात होण्याची अपेक्षा प्रशासनासह नागरिकांनाही आहे.
अवकाळीमुळे आलं पाणी
दरम्यान, सध्या अवकाळी पाऊस सुरु झाल्याने धरणात 2 हजार क्युसेक विसर्गाने पाणी येऊ लागल्याचे कार्यकारी रावसाहेब मोरे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. यावर्षी पाण्याचे काटेकोर नियोजन झाल्याने केवळ 60 टक्के पाणी देखील पुरवून वापरता आल्याचे त्यांनी म्हटले. तरीही उजनी धरणाच्या परिसरात अगदी वेळेवर म्हणजे 30 जूनपासून जरी पाऊस सुरु झाला तरी अजून एक महिना प्रशासनाला काढावा लागणार आहे. दरवर्षी उजनी धरणात जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये पाणी येण्यास सुरुवात होते. यावेळेसही असेच झाले तर, दुष्काळाची दाहकता अजून तीव्र होणार आहे.