Uddhav Thackeray Birthday : उद्धव ठाकरे यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत, मातोश्रीवर न येता सामाजिक उपक्रम राबवण्याचं शिवसैनिकांना आवाहन
Uddhav Thackeray Birthday : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे त्यांना यंदा वाढदिवस साजरा करायचा नाही असं ठरवलं आहे.
Uddhav Thackeray Birthday : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यंदा वाढदिवस (Birthday) साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे (Irshalwadi Landslide) त्यांना यंदा वाढदिवस साजरा करायचा नाही असं ठरवलं आहे. आयाधी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता.
27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. शिवसैनिक त्यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मातोश्री निवासस्थानी शिवसैनिक जमा होतात मात्र यंदा इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
माझ्या वाढदिवसाला कोणीही मातोश्री निवासस्थानी येऊ नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. तसंच या दिवशी कोणते तरी सामाजिक उपक्रम राबवावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही यंदा वाढदिवस साजरा केला नाही
दरम्यान याआधी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी असतो. परंतु इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दोघांनी यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याचा निर्णय जाहीर केला. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणीही आपला वाढदिवस साजरा करु नये. पुष्पगुच्छ, होर्डिंग, जाहिरातींवर खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुनर्उभारणी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी उपयोगात आणावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं. तर वाढदिवसाबद्दल कोणीही होर्डिंग, बॅनर लावू नये तसेच जाहिरातीदेखील देऊ नये, गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी इर्शाळवाडीसाठी वापरण्यात यावा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे इर्शाळवाडी दरड दुर्घटनाग्रस्तांचा भेटीला
उद्धव ठाकरे यांनी काल इर्शाळवाडी दरड दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांना धीर देखील दिला. पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठिशी आहोत अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली. तसंच अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
इर्शाळवाडी दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 हून अधिक नागरिकांचा शोध सुरु आहे. आजही बचावकार्य केलं जाणार आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफसह विविध दलाची पथकं कार्यरत आहेत. मात्र पाऊस, चिखल आणि वाट निसरडी झाल्यामुळे बचावकार्यात अडचण निर्माण होत आहेत.
हेही वाचा