Shivsena : उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? राज्यातील सत्तासंघर्षावर सोमवारी महत्त्वपूर्ण सुनावणी
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी उद्या सर्वात महत्वाचा दिवस असून या प्रकरणाचा निकाल लागणार की हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवलं जाणार हे समजेल.
मुंबई : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत सोमवारचा दिवस सुप्रीम कोर्टात महत्वाचा आहे. जून महिन्यापासून सुरु असलेली ही सुनावणी आता घटनापीठाकडे जाणार का की सध्याचे सरन्यायाधीश रमण्णा आपल्या निवृत्तीआधी काही महत्वपूर्ण निकाल देणार याचं उत्तर उद्या कळेल.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी घटनापीठाकडे जाणार की सध्याचे सरन्यायाधीश निवृत्तीआधी महत्वाचा निकाल देऊन जाणार या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर सुप्रीम कोर्टात उद्या मिळणार आहे. सोबतच निवडणूक आयोगातही जी लढाई सुरु झालीय, त्यावर कोर्ट काय आदेश देतं हेही पाहणं महत्वाचं असेल.
काय अपेक्षित आहे उद्याच्या सुनावणीत?
-सरन्यायाधीश रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होतायत, निवृत्तीआधी ते हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवतायत का हे उद्या कळेल.
-प्रकरण घटनापीठाकडे गेले तर ते अधिक काळ लांबेल याचीही शक्यता आहे.
-काही मुद्द्यांवर घटनापीठाकडे हे प्रकरण जाईल, पण काही मुद्द्यांवर कोर्ट आपला निकाल देतं का याचीही उत्सुकता असेल.
-विशेषत: अपात्रतेसंदर्भातल्या कारवाईबाबत आता अजून किती काळ स्थगिती राहते हे पाहणं महत्वाचं असेल.
निवडणूक आयोगातही कार्यवाही सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे गटानं चार आठवड्यांचा वेळ मागितला, पण आयोगानं दोन आठवड्यांचाच वेळ दिला आहे. त्यामुळे त्यासंदर्भात उद्या कोर्टासमोर काही मुद्दे येतात का हेही पाहावं लागेल.
सुप्रीम कोर्टातली सुनावणी उद्या आहे तर लगेच मंगळवारी निवडणूक आयोगातही महत्वाचा दिवस आहे. कारण 23 ऑगस्टपर्यंत उद्धव ठाकरे गटानं आपलं म्हणणं मांडावं असं आयोगानं म्हटलं आहे. साहजिक आहे, जर कोर्टातली कारवाई लांबणार असेल तर त्याआधी आयोगाचा निर्णय येतोय का हे पाहावं लागेल. मागच्या सुनावणीत कोर्टानं आयोगाला महत्वाचे निर्णय घेऊ नका असं तोंडी सांगितलं होतं. पण कारवाई थांबवली नव्हती. तसंच लेखी आदेशात निर्णय न घेण्याबद्दलची स्पष्टता नाहीय. त्यामुळे आयोगाच्या निर्णयावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.
मागच्या वेळी 3 आणि 4 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. पण त्यानंतर सलग दोनवेळा या प्रकरणाची तारीख लांबणीवर गेली. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारही पार पडला. त्यामुळेच आता उद्याच्या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल.
हे प्रकरण 21 जूनपासून सुप्रीम कोर्टात आलेलं आहे. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या व्हॅकेशन बेंचने हे प्रकरण ऐकलं. त्यानंतर सरन्यायाधीशांच्या तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली. पण उद्याची सुनावणी होतानाही या तीन पैकी एका न्यायमूर्तींचं नाव बदललं गेलंय. त्यामुळे प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे जाण्याची शक्यता वाढली आहे. तसं झाल्यास हा लांबलेला वेळ साहजकिच शिंदे गटाच्या पथ्थ्यावर पडेल. त्यामुळे उद्या कुठला महत्वपूर्ण आदेश येतो की केवळ हे प्रकरण आणखी लांबणीवर पडतं याची उत्सुकता असेल.