(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'रिफायनरीसाठी उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबियांचा अद्यापही हिरवा कंदिल नाही'
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोकणातील रिफायनरीसाठी सकारात्मक असल्याचा दावा देखील केला जात आहे. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे
रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा, दावे केले जात आहेत. अशावेळी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कोकणातील रिफायनरीसाठी (konkan ratnagiri refinery)सकारात्मक असल्याचा दावा देखील केला जात आहे. याबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारले असता, रिफायनरीबाबत उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचा अद्यापही हिरवा कंदिल मिळालेला नाही. उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबिय रिफायनरी प्रकल्पासाठी सकारात्मक असल्याच्या चर्चा केवळ निराधार आहेत, असं राऊतांनी सांगितलं.
राऊत म्हणाले की, केवळ काही लोकांकडून त्यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीनं वापर सुरू असल्याची प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी 'एबीपी माझा'कडे बोलताना दिली आहे. रिफायनरीबाबत समर्थक आणि विरोधक यांचं म्हणणं मी उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवले आहे. पण, त्यावर त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे रिफायनरासाठी आग्रही आहेत या चर्चांना काहीही अर्थ नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
रिफायनरीबाबत शिवसेनेची अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका नाही, रिफायनरी विरोधकांना विनायक राऊतांची माहिती
दरम्यान, यापूर्वी विरोधक आणि समर्थक यांनी देखील खासदार विनायक राऊत यांची भेट घेत आपलं म्हणणं मांडलं होतं. त्यानंतर राऊत यांन मातोश्रीवर जात दोन्ही बाजू उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. सध्या स्थानिक पातळीवरच्या घडामोडी पाहता रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागातून रिफायनरी व्हावी यासाठी समर्थन केलं जात आहे. पण, ज्या गावामध्ये रिफायनरी होणार आहे, त्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगाव या ठिकाणी प्रस्तावित रिफायनरी उभारावी अशी मागणी केली जात आहे. पण,आता पाच पैकी चार अर्थात सोलगाव, शिवणे खुर्द, देवाचे गोठणेनंतर आता गोवळ गावानं देखील रिफायनरीविरोधात ठराव केला आहे. मासिक सभेत झालेल्या या ठरावामध्ये वरिष्ठ कार्यालयाचा कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नसल्याचा उल्लेख देखील गोवळ ग्रामपंचायतीनं केला आहे.