कोकणातील रिफायनरी प्रकरणात नवा ट्विस्ट; पाच पैकी तीन गावांचा रिफायनरी विरोधात ठराव!
कोकणातील रिफायनरीबाबतच्या घडामोडी कायम आहेत. समर्थनार्थ, विरोधात संघटना. राजकीय नेते, पुढारी यांच्या गाठीभेटी आणि निवेदनं असं सध्या कोकणातील वातावरण आहे
रत्नागिरी : कोकणातील रिफायनरीबाबतच्या घडामोडी कायम आहेत. समर्थनार्थ, विरोधात संघटना. राजकीय नेते, पुढारी यांच्या गाठीभेटी आणि निवेदनं असं सध्या कोकणातील वातावरण आहे. कुठं समर्थनार्थ तर कुठं विरोधातील शक्तीप्रदर्शन अशा रितीनं रिफायनरीबाबतच्या घडामोडी सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार राऊत यांनी स्थानिकांना काय हवं? त्यांना काय वाटतं? यांचा विचार शिवसेने करेल असं म्हटलं आहे. मी दोन्ही बाजू पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचवेन असं देखील आश्वासन त्यांनी दोन्ही बाजुंना दिलं आहे. पण, त्याचवेळी या साऱ्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. कारण, रिफायनरीकरता जागा जाणाऱ्या पाच गावांपैकी तीन गावांनी रिफायनरी नको असा विरोधातील ठराव केला आहे.
सोलगाव, शिवणे खुर्द आणि देवाचे गोठणे यांनी हा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत केला आहे. फेब्रुवारी 2021 ते जुलै 2021 या कालावधित हे ठराव केले गेले आहेत. मुख्य बाब म्हणजे बारसू - सोलगाव या ठिकाणी एमआयडीसी प्रस्तावित आहे. त्यामुळे या ठिकाणी रिफायनरी उभारावी. अतिरिक्त लागणारी जागा ही बाजुच्या गावांमधील घ्यावी असा एक मतप्रवाह आहे. त्या दृष्टीनं चाचपणी आणि हालचाली होत असताना तिन गावांनी केलेले विरोधातील ठराव आता समोर आल्यामुळे या संपूर्ण घडामोडींमध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. शिवाय उर्वरित दोन अर्थात बारसू आणि गोवळ या ग्रामपंचायतींमध्ये देखील अशाच प्रकारचा ठराव करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.