Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याआधी शिवसेनेचा धमाका? शिंदे गटाच्या बंडानंतर पहिल्यांदाच गटप्रमुखांना उद्धव ठाकरे संबोधन करणार
उद्धव ठाकरेंविरुद्ध भाजप, मनसेसह शिंदेगटाचं आव्हान असणार आहे. तेव्हा आपला गड मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे नेस्कोच्या मैदानात उतरणार आहे.
मुंबई : दसरा मेळाव्याआधीच (Dasara Melava) उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) तोफ मुंबईत धडाडणार आहे. ठाकरेंचा आवाज संपूर्ण देशभर घुमणार असा हा मेळावा असणार आहे. कारण शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा होत आहे. तेव्हा उद्धव ठाकरे आपल्या भात्यातल्या शस्त्रांसह रणांगणांत उतरतील. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला आहे.
गेली अनेक वर्ष सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका आपल्याच ताब्यात ठेवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. पण हे आव्हान तितकंस सोपं नसणार आहे. कारण शिवसेनेतला शिंदे गट आता वेगळा होऊन तो भाजपसोबत सध्या सत्तेत आहे. उद्धव ठाकरेंविरुद्ध भाजप, मनसेसह शिंदेगटाचं आव्हान असणार आहे. तेव्हा आपला गड मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे नेस्कोच्या मैदानात उतरणार आहे.
उद्धव ठाकरे या भाषणात काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता असणार आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर मंचावर कुठेच भाषण केलं नव्हतं. बंडानंतर शिवसैनिकांमघ्ये बळ निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरतील पण शिंदेंसह ठाकरेंच्या निशाण्यावर भाजपही असणार आहे.
ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?
- आतापर्यंत शिवसेनेचं राजकारण हे बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि मराठी माणूस यांच्या भोवती फिरत आलेलं आहे. बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना भाजपनं फोडल्याचा वारंवार आरोप होत आहे. अगोदर पक्ष फोडला, मग चिन्हासाठी धडपड आणि आता दसरा मेळाव्यासाठी असलेल्या शिवतीर्थासाठी भांडण या मुद्दयांवरून उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घालू शकतात.
- गणेशोत्सवाच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या दौ-यावर होते, त्यावेळी भाजप नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत शाहांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं टार्गेट अमित शाह असू शकतं.
- एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडात कुणाकुणाचा हात आहे. शिंदे सुरतला जाताना काय काय घडलं त्याआधी काय काय संभाषण झालं याचा खुलासा करू शकतात
- खासदार राहुल शेवाळेंनी शिंदे गटात प्रवेश करताना उद्धव ठाकरेंवर युतीसंदर्भात आरोप केले होते. तसेच मागील काही महिन्यांत शिंदे गटाच्या आमदारांनी मातोश्रीविरोधात केलेल्या व्यक्तव्यांचा समाचार उद्धव ठाकरे घेतील.
- केंद्रीय यंत्रणांचा राज्यात होत असलेला वापर, मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावरून मातोश्रीवर होत असलेल्या आरोपांवरून मागील काही दिवसांत मोठं राजकारण घडलं होतं यावर देखील विरोधकांना ठाकरे चोख प्रत्युत्तर देतील
- अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे एकनाथ शिंदे, उदय सामंत, भरत गोगावले, दिपक केसरकर आणि गुलाबराव पाटील हे नेते ठाकरेंच्या यादीत असतील
राज्यात सध्या आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. तळागाळातल्या शिवसैनिकापर्यंत पोहचवण्याचं काम आदित्य ठाकरे करत आहेत. शिंदे सरकारच्या विरोधात भाषणं करून ठाकरेंनी रणशिंग फुंकलंय. ही लढाई पुढे घेऊन जायचं काम आता उद्धव ठाकरे करणार आहेत. नेस्कोच्या मैदानात ठाकरे आपल्या भात्यातले धारदार बाणा सोडतील आणि विरोधकांना घायाळ करण्याचा प्रयत्न करतील. कारण आपल्या डोळ्यांसमोर वाढलेली सेना उभी फुटताना जी पाहिलीय त्यामुळे ठाकरे दिवाळीआधीच या मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय फटाके फोडायला सुरु करतील.
एकेकाळी खांद्याला खांदा लावून ठाकरे, शिंदे आणि फडणवीस कामं करायचं पण आता ठाकरे विरुद्ध सारे असं चित्र तयार झालं आहे. गटप्रमुखांचा मेळावा म्हणजे पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्न म्हणावा लागेल. बंडानंतर अनेक कार्यकर्ते, नेते हे शिंदे गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे उरलेसुरलेल्यांना आपल्या सोबत ठेवण्याचं काम ठाकरे या मेळाव्यातून करताना दिसतील.