Kiran Samant: किरण सामंत यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी मागितली, कामाला लागा; उदय सामंत यांचा कार्यकर्त्यांना आदेश
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची किंगमेकर अशी ओळख असून त्यांच्यासाठी लोकसभेची उमेदवारी मागितल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
सिंधुदुर्ग: कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) इच्छुकांच्या संख्येत वाढच होत असून प्रत्येक पक्षाने या मतदारसंघावर दावा केला आहे. आता त्यासंदर्भात राज्याचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एक मोठं वक्तव्य केलं. एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण किरण सामंत (Kiran Samant) यांच्या खासदारकीसाठी उमेदवारी मागितली असल्याचं ते म्हणाले. त्यांना बहुमताने निवडून आणण्याचं आवाहनही उदय सामंत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.
किरण सामंत यांच्या खासदारकी लढवण्याबाबतच्या चर्चेला उदय सामंत यांचा दुजोरा मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्याकडे माझं मागणं, भैया सामंत यांचा बहुमतांनी निवडून आणा असं आवाहन उदय सामंत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केलं. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची लोकसभेची जागा आपण भैया सामंत यांच्यासाठी मागितली आहे, त्यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचंही ते म्हणाले. विरोधकांनादेखील सोबत घेऊन काम करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी या आधीही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी उदय सामंत यांनी सुरुवातीपासूनच मतदारसंघात राजकीय फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. आता तर त्यांनी जाहीर कुबुलीच दिली असल्याने किरण सामंत हे लोकसभा निवडणूक लढवणार हे पक्क झालं आहे.
किंगमेकर अशी ओळख
किरण ऊर्फ भैय्या सामंत यांना किंगमेकर म्हणून रत्नागिरीमध्ये ओळखलं जातं. लोकांची विविध कामं हाताळताना किरण सामंत दिसून येतात. बांधकाम व्यवसायामध्ये असलेले किरण सामंत यांची एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख आहे. उच्च शिक्षित असलेले किरण सामंत यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडल देखील मिळवलेले आहे. सध्या किरण सामंत महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील असून विविध क्षेत्रात त्यांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे. पडद्यामागे असलेले किरण सामंत उदय सामंत यांच्यापाठी खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे रत्नागिरीमध्ये त्यांना किंगमेकर म्हणून ओळखले जाते.
सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी प्रमोद जठार इछुक
ताकाला जाताना भांड कशाला लपवायचे? असं म्हणत महायुतीने विश्वास दाखवल्यास मी दिल्लीत निवडून जाईन असं वक्तव्य भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांनी या आधी केलं आहे. मागची दोन टर्म भाजपने विनायक राऊत यांना अडीच लाख मते देऊन खासदार केलं. मात्र विनायक राऊत यांनी एकही रोजगार किंवा प्रकल्प आणला नाही, विनायक राऊत यांनी मुंबईतील खंबाठा प्रकल्पाचे वाटोळे केले अशी टीकाही त्यानी केली.
विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे गटाचा खंबाटा केला, आता कोकणचा खंबाटा होऊ नये म्हणून विनायक राऊत यांना हटवावे लागणार असं प्रमोद जठार म्हणाले. रत्नागिरी- सिंधुदु्र्गमध्ये कमळाचा खासदार निवडून आला तर आम्ही दोन लाख रोजगार मिळवून देऊ असं आश्वासनही त्यांनी दिलं. कोकणात ग्रीन फिल्ड प्रकल्प झाल्यास आर्थिक आणि पर्यटन राजधानीला जोडणारा कोकण भविष्यात देशाची आर्थिक राजधानी होईल असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला
निलेश राणे लोकसभेसाठी उत्सुक?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी एक ट्विट करत आपण अचानक राजकारणातून बाजूला होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू होत्या. राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे निलेश राणे बाजूला होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय 24 तासांमध्ये मागे घेतला होता.
ही बातमी वाचा: