मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाकडून दोघांची हत्या, पाच गंभीर जखमी; यवतमाळमधील घटना
मानसिक संतुलन बिघडल्याने तरुणाने दोन जणांची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली तर पाच जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये तरुणाच्या आई आणि बहिणीचाही समावेश आहे.
यवतमाळ : मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने दोघांची कुऱ्हाडीने हत्या करुन पाच जणांना जखमी केल्याची घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्याच्या कारला देव इथे रविवारी मध्यरात्री ही घटना घडली. या तरुणाने मध्यरात्री झोपेत असलेल्या भावकीतील लोकांवर हल्ला केला. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तरुणाच्या आई आणि बहिणीचाही समावेश आहे.
गोकुळ राठोड (वय 23 वर्ष) असं आरोपी तरुणाचं नाव आहे. हा तरुण कारला देव इथे आपल्या कुटुंबासोबत राहतो. काल मध्यरात्री दरम्यान तीनच्या सुमारास गोकुळने घरातील धारदार कुऱ्हाड काढली आणि घरात झोपेत असलेले आत्याचे पती वसंता राठोड यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने आपली आई सुनिता राठोड हिच्यावर सुद्धा कुर्हाडीने वार केले. आईवर वार करत असताना त्याची बहीण अश्विनीला जाग आली. अश्विनीने गोकुळला रोखण्याचा प्रयत्न केला. पण यात अश्विनी सुद्धा गंभीर जखमी झाली.
घरातील कुटुंबीयांना जखमी करुन गोकुळ हा शेजारी राहत असलेल्या आपल्या भावकीतील नेरचंद आडे यांच्या घरी गेला. ते घराच्या अंगणात झोपून असल्याचे पाहून त्यांच्यावर सुद्धा गोकुळने कुर्हाडीने सपासप वार केले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याशिवाय काका संजय राठोड यांना सुद्धा गंभीर जखमी केले. संबंधित तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याने हे हत्याकांड घडल्याचं बोललं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पुसद ग्रामीणचे ठाणेदार यांनी घटनास्थळी जात आरोपीला अटक केली. पंचनामा केला असून पुढील तपास पुसद ग्रामीण पोलीस करत आहेत.