Parbhani News : भंगारातील जिलेटीन कांडी मोबाईलच्या बॅटरीला लावली; स्फोट होऊन दोन चिमुकले गंभीर जखमी
परभणीच्या जिंतुर शहरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून पालकवर्गात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
परभणी : लहाण मुलं खेळताना काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. अनेकदा मुल खेळात व्यस्त असताना नको ती करामत करतात आणि स्वत:ला इजा करुन घेतात. परभणीच्या जिंतुर शहरात देखील अशीच एक घटना घडली आहे. याठिकाणी दोन चिमुकले खेळत असताना कचऱ्यातील जिलेटीनची कांडी त्यांनी उचलली आणि घरातील मोबाईलच्या बॅटरीला लावली. यामुळे त्याठिकाणी स्फोट झाला ज्यात हे दोन्ही चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान अत्यंत धोकादायक असणारी ही जिलेटीनची कांडी कचऱ्यात आली कुठून असा प्रश्न याठिकाणी उपस्थित केला जात आहे. जखमी झालेल्या दोघांनाही सध्या परभणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर त्याठिकाणी उपचार सुरु आहेत.
नेमकं काय घडलं?
परभणीच्या जिंतुर शहरातील नवीन एकलव्य शाळा परिसरात शेख अस्लम आणि अनस शाहेद पठाण ज्यांचं वय जवळपास 10 ते 11 वर्षे असून हे राहत आहेत. हे दोघेजण घराजवळ खेळत असताना रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वायर असलेल्या काही कांड्या दिसून आल्या. यावेळी दोघांनी सदरील जिलेटीन कांड्या उचलून जुन्या मोबाईलच्या बॅटरीला वायर जोडले असता जिलेटीन कांडी फुटल्याने मोठा आवाज झाला अस्लम शेख याचा हातात जिलेटीन असल्यामुळे संपूर्ण हाताला आणि डोळ्याला मोठी जखम झाली. तर जवळच असलेल्या अनस पठाण याच्याही डोळ्याला गंभीर इजा झाली. यानंतर परिसरातील नागरिकांनी दोघांनाही तातडीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी डॉ. हनिफ खान यांनी जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. दरम्यान जिलेटीनसारखा स्फोटक पदार्थ शहरातील नागरिवस्ती कुठून आला आणि ज्यामुळे हा भयंकर प्रकार घडला असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्यानेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या