मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही; कडूंच्या आंदोलनात महादेव जानकर कडाडले
देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आहे, पण शेवट आम्ही करू. सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र, आम्ही तुला शांत बसू देणार नाही.

नागपूर : शेतकरी (Farmers) कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याच्या मागणीवरुन प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून विविध शेतकरी नेते या आंदोलनात सहभागी होत नागपूरला (Nagpur) पोहोचले आहेत. नागपूर येथील मेळाव्यातून नेत्यांची आक्रमक भाषणे सुरू हेत. साले तुम्ही डरपोक, कोर्टाला समोर करता, नामर्दाची औलाद आहे. जेल कमी पडेल, आम्हा अटक करा, अशा शब्दात बच्चू कडू यांनी आपली भूमिका मांडली. तर, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev jankar) यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली आहे, पण शेवट आम्ही करू. सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र, आम्ही तुला शांत बसू देणार नाही. सरकारच्या माध्यमातून, कोर्टाच्या माध्यमातून तुम्ही डाव टाकताय. मिस्टर फडणवीस तुझा बिस्तरा गुंडाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे म्हणत राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी महायुती सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. आय एम कोर्ट, वुई आर कोर्ट, जनता ही कोर्ट आहे. जोपर्यंत हे नेते सांगत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबवलं जाणार नाही. पोलिसांनी आमच्या माणसांना तुम्ही घेऊन जावा, सरकार हरतंय का आम्ही हरतोय हेच आम्हाला बघायचं आहे, असेही महादेव जानकर यांनी नागपुरातील एल्गार मेळाव्यातून बोलताना म्हटले.
आम्ही मागे हटणार नाही, आमची व्यवस्था जेलमध्ये करावी - कडू
कोर्टाचा आदेश आला आहे, टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीवरून न्यायालयाने आदेश काढला. मात्र, रोज शेतकरी आत्महत्यांच्या बातम्यांवर कोर्ट दखल घेत नाही. न्यायालय शेतकरी मृत्यूची दखल घेत नाही, आता आम्ही न्यायालयाबद्दल विचार करू. आम्ही इथून हटायला तयार आहोत आमची जेलमध्ये नेण्याची व्यवस्था करावी, असे बच्चू कडू यांनी म्हटले. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतो, आम्हाला जेलमध्ये घेऊन चला. आम्ही पोलिसांच्या कृतीची वाट पाहू. न्यायालयाचा अवमान आम्ही करू इच्छित नाही. पोलिसांनी जबाबदारी पूर्ण करावी, कार्यकर्ता पोलीस सांगतील त्या गाडीत बसायला तयार आहे, असेही बच्चू कडू यांनी म्हटले. जरी यांनी कमरेचं सोडलं असलं तरी आम्ही कमरेचं सोडलेला नाही. पोलिसांनी एक-एक करून आम्हाला ताब्यात घ्यावं आणि जेलमध्ये घेऊन जावं. आम्ही कोणीही इकडे-तिकडे जाणार नाही, थेट पोलिसांच्या गाडीत जाऊन बसायचं, असे बच्चू कडू यांनी आंदोलकांना सांगितले.
आंदोलनातील कार्यकर्ते निघू लागले
दरम्यान, जरी बच्चू कडू यांच्या आंदोलनातील नेते आम्ही कोर्टाचा अवमान करणार नाही. आम्ही स्वतःला अटक करून घेऊ, अशी भाषा करत असले तरी गेल्या काही वेळापासून छोट्या छोट्या ग्रुपमध्ये जे कार्यकर्ते आहेत ते निघू लागल्याचं दिसत आहे. त्यामुळे, अटक व्हायचे नाही, या भावनेतून कार्यकर्ते निघत आहेत की, हा दुसऱ्या गनिमीकाव्याचा हा डाव आहे हे मात्र स्पष्ट नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अमरावतीच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे, उद्या विदर्भातील शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष देऊन आंदोलनाची भूमिका घेतात का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा
राज ठाकऱ्या तुझ्यात दम असेल तर चुनाव रोक के दिखाव; विरोधकांच्या मोर्चावरुन गुणरत्न सदावर्ते आक्रमक
























