बीडमध्ये पाणी टंचाईचे दोन बळी, बैलगाडी उलटल्याने दोन लहानग्यांचा मृत्यू
सध्या मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी खालावली आहे. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरी सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
बीड : मराठवाड्यातील बीडमध्ये पाणी टंचाईचे दोन बळी गेले आहेत. पाण्याचे ड्रम भरुन ठेवलेली बैलगाडी उलटल्याने दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. बीडमधील वडवणी तालुक्यातील चिंचाळा तांडा येथील ही घटना आहे.
जयदेव बळीराम राठोड (8), अविष्कार बळीराम राठोड (4) अशी मृत मुलांची नावे आहेत. चिंचाळा तांडा येथे एक बैलगाडी उभी होती. या बैलगाडीत पाण्याने भरलेले दोन ड्रम ठेवले होते. या बैलगाडीजवळ खेळत असताना अचानक ही बैलगाडी उलटली. या बैलगाडीखाली सापडल्याने जयदेव आणि अविष्काय दोन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे.
सध्या मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणीपातळी खालावली आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये कमालीची पाणीकपात करण्यात आली आहे. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरी सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशा गंभीर परिस्थितीत निवडणुकीदरम्यान घोषणांचा पाऊस पाडण्याऐवजी नागरिकांना पाण्याच्या दुष्काळापासून दूर करण्याविषयी लक्ष देण्याची मागणी होत आहे.