(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Todays Headline 10th June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या
National News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान आणि निकाल
राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. कुणाच्या गळ्यात खासदारकीची माळ पडणार हे आज स्पष्ट होणार असून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. दुपारी 4 वाजल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकांचं सत्र सुरू असून सिल्वर ओकवर काल रात्री काँग्रेस, शिवसेना नेते पवारांच्या भेटीला गेले होते. त्यांच्यात दोन स्वतंत्र बैठका पार पडल्या. भाजपचीही बैठक झाली.
एमआयएमची भूमिका आज 9 वाजता स्पष्ट होणार
एमआयएमची भूमिका आज सकाळी 9 वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून पक्षाचे अध्यक्ष ओवैसी हे ट्वीटच्या माध्यमातून मत कुणाल देणार हे स्पष्ट करणार आहेत. काल रात्री वरळीतल्या हॉटेल ‘ब्लू सी’वर राष्ट्रवादीच्या डिनरला खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादी नेते आणि इम्तियाज यांच्यात खलबतं झाली.
उद्या लवकर उठा, लवकर निघा, वेळेत विधानभवनात पोहोचा असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी आमदारांना दिला आहे. विधानभवनात पोहोचल्यानंतर आधी राष्ट्रवादी आमदारांना अजित पवारांच्या केबिनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आलेत.
अनिल देशमुख मतदान करणार का याचा आज फैसला
अनिल देशमुखांच्या मतदानासाठीच्या आशा कायम असून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज तातडीची सुनावणी होणार आहे. अनिल देशमुखांनी मुंबई सत्र न्यायालयानं मतदानाची परवानगी नाकारल्या नंतर त्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं. यावर आज सकाळच्या सत्रात तातडीची सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रासोबत राजस्थान, कर्नाटक आणि हरयाणात राज्यसभेसाठी मतदान
महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थान, कर्नाटक आणि हरयाणा या तिन्ही राज्यांमध्ये राज्यसभेसाठी अटीतटीची निवडणूक होणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज उमेदवारांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. राजस्थानमध्ये 4 जागांसाठी 5 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. राजस्थानमधून रणदीप सिंह सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी काँग्रेसचे उमेदवार आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर उभे असलेले अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रां यांच्यामुळे तिसऱ्या जागेसाठी अटीतटीची लढत होणार आहे.
हरयाणात दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसनं अजय माकन यांना उमेदवारी दिली आहे. कर्नाटकात चार जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपनं घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांचा समावेश आहे.
राज्यात पुढील 48 तासामध्ये मान्सून सक्रिय होणार
पुढील 48 तासात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्रात परिस्थिती अनुकूल आहे. राज्याच्या दक्षिण भागात पुढील दोन दिवसांत मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काल राज्याच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व जोरदार पाऊस कोसळला. नागपूर, बुलढाणा, नाशिकचा ग्रामीण भाग, औरंगाबाद, मुंबई, कल्याण- डोंबिवली, भिवंडी या ठिकाणी पाऊस पडला.
पंतप्रधानांचा आज गुजरात दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर असून ते 'गुजरात गौरव अभियान' या कार्यक्रमाच्या अंतर्गत अनेक विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. अहमदाबाद येथे मोदींच्या हस्ते IN-SPACe च्या मुख्यालयाचं उद्घाटन होणार आहे.