(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Todays Headline 4th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन
पाच दिवसांच्या गणेशाचं आज विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली असून मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. मुंबईतील प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच यासाठी तब्बल 10 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.
आरे कारशेडप्रकरणी पर्यावरणवाद्यांचं आंदोलन
आरे कारशेड प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली गेली असली तरी पर्यावरणप्रेमींकडून आंदोलन सुरुच राहणार आहे. आज सकाळी 11 वाजता आरेतील पिकनिक स्पॉट परिसरात पर्यावरणप्रेमी एकत्रित येत आंदोलन करणार आहेत.
महागाईविरोधात काँग्रेसचं आज आंदोलन
वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीवरून भाजप सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. आज सकाळी 11 वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. 'महागाई पर हल्ला बोल' असे या रॅलीचे नाव असेल. काँग्रेसच्या कमिटीच्या मुख्यालयातून काँग्रेस नेते राहुल गांधी बसने दिल्लीतील रामलीला मैदावावर येऊ शकतात. त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते असणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत येणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत येणार आहेत. आज रात्री 9.30 वाजता अमित शाह मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते रात्री सह्याद्री गेस्ट हाऊसला मुक्कामी राहतील. त्यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलीस सतर्क आहेत.
ठाण्यात रेल्वे प्रवाशांचे आंदोलन
ठाण्याच्या पुढच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांचा लढा सुरूच राहणार असून आज दुपारी 12 वाजता मुंब्रा स्थानकात सर्व प्रवासी जमणार आहेत. कळवा-मुंब्रा इथे थांबणाऱ्या 21 लोकल बंद करण्यात आल्याने प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मध्य रेल्वे विरोधात, एसी लोकल विरोधात सातत्याने ट्वीट करून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड विरोध दर्शवत आहेत.
भारत-पाकिस्तान पुन्हा आमने सामने
भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार असून आज संध्याकाळी 7.30 वाजता सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा आशिया चषकातील सुपर 4 मधील सामना खेळवला जाईल. याआधी 28 ऑगस्ट रोजी भारताने ग्रुप स्टेजच्या सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात दिली होती. यावेळी आधी फलंदाजी करत पाकिस्तानने 147 धावा केल्या होत्या. भारताने 19.4 षटकात 5 गडी गमावत 148 धावांचे लक्ष गाठले. यावेळी जाडेजा आणि पांड्या यांनी कमाल कामगिरी केली होती. ज्यानंतर आता सुपर 4 च्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.