Todays Headline 27th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
किरीट सोमय्यांची अनिल परबांच्या दापोलीतील रिसॉर्टपर्यंत पायी यात्रा
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. किरीट सोमया आज खेड रेल्वे स्थानकापासून दापोलीतील साई रिसॉर्टपर्यंत 28 किमी अंतर पायी जाणार आहेत. दापोली मुरुड समुद्र किनारी बांधलेले साई रिसॉर्ट हे अनिल परब यांनी बेकायदेशीर बांधल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असनाना किरीट सोमय्यांनी मुलुंडपासून हातोडा यात्रा काढून दापोलीत प्रवेश केला होता. आता राज्यात शिवसेना - भाजप सरकार आल्यानंतर किरीट सोमय्या पुन्हा एकदा दापोलीत जाणार आहेत.
आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 2 वाजता ते नागपूर विमानतळावर पोहचतील. विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. यावेळी शिवसैनिकांकडून त्यांचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर ते शिवसेनेचे आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या घरी जाणार आहेत. त्याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत.
आज तान्हा पोळा
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा म्हणजेच लहान मुलांचा पोळा साजरा केला जातो. विदर्भातील सर्वात आगळावेगळा आणि प्रसिद्ध असा पोळा वर्ध्यातील सिंदी रेल्वेचा आहे. सिंदी रेल्वे येथे गेल्या अनेक वर्षांपासून भव्य तान्हा पोळा साजरा होतो. कॊरोनाच्या दोन वर्षांत अतिशय साध्या पद्धतीने पोळा भरला. मात्र यावर्षी दोन वर्षांची कसर भरून काढली जाईल.
आजपासून आशिया कपला सुरुवात
आशिया कप 2022 स्पर्धेला आजपासून यूएईमध्ये सुरुवात होत आहे. भारत आपला पहिला सामना रविवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. आज पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा असणार असून जवळपास 4 वर्षानंतर ही भव्य स्पर्धा पार पडत आहे.