Todays Headline 24 october : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
आज लक्ष्मीपूजन
दिवाळीच्याच दिवशी माता लक्ष्मी प्रगट झाली होती अशी मान्यता असून आजच्याच दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विवाह झाला होता. दिवाळीच्या सांयकाळी लक्ष्मी, गणेश आणि भगवान कुबेराची पुजा केली जाते. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यंदा अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 25 ऑक्टोबर सांयकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे.
दिवाळी पहाट कार्यक्रमात शिंदे गट आणि ठाकरे गटात चढाओढ
दहीहंडी, नवरात्र नंतर दिवाळी पहाट कार्यक्रमात देखील शिंदे गट आणि ठाकरे गटात चढाओढ. आज सकाळी तलावपाळी येथे शिंदे गटातील युवासेनेकडून आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या जागी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळाल्याने, राजन विचारे यांनी आपला कार्यक्रम त्याच्याच थोडा पुढे आयोजित केला आहे. तर राजन विचारे यांच्या पुढे चिंतामणी चौकात शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे ठाण्यातील तरुणाईची चंगळ असली तरी राजकीय रस्सीखेच दिसून येणार आहे. दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाईल. तसेच राजकीय सामना देखील रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीची ठाण्यातील दिवाळी पहाट कोणत्याही वादा विना पार पाडण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
लक्ष्मीपूजनासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग
आज बीएसईचा लक्ष्मीपूजनासाठी विशेष मुहूर्त ट्रेडिंग होईल. संध्याकाळी 6 वाजता प्रे-ओपन सेशन असेल तर संध्या. 6:15 ते संध्याकाळी 7:15 पर्यंत विशेष ट्रेडिंग पार पडेल. दुपारी 3:30 वाजता लक्ष्मीपूजन असणार आहे. तर संध्याकाळी 5 ते 6 मध्ये बीएसईसंदर्भातले विशेष पुरस्कार प्रदान केले जातील.
शरद पवार आज पुरंदरच्या दौऱ्यावर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज पुरंदरच्या दौऱ्यावरती असणार आहेत. आज सकाळी पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे शरद पवार अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांशी सवांद साधणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सैनिकांसोबत दिवाळी साजरी करू शकतात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सैनिकांसोबत दिवाळी साजरी करू शकतात. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी गेल्या 8 वर्षांपासून सैनिकांमध्ये दिवाळीचा सण साजरा करत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
बुलढाणा : अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत न केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय झाल्याचा आरोप करत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी "शेतकऱ्यांची दिवाळी शासनाच्या दारी" हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज जळगाव जामोद उपविभागीय कार्यलयासमोर करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.