Todays Headline 22 october : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
आज धनत्रयोदशी
दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी हा धन्वंतरी दिन म्हणून साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी पृथ्वीवर येण्यापूर्वी आयुर्वेद गुप्त अवस्थेत होता. त्यांनी आयुर्वेदाचे आठ भाग करून सर्व रोगांवर औषधोपचाराची पद्धत विकसित केली अशी अख्यायिका आहे. आयुर्वेदाचे संस्थापक आणि वैद्यकीय शास्त्राचे देवता भगवान धन्वंतरी हे आरोग्य, वय आणि तेज यांची देवता असल्याचं मानलं जातंय. आरोग्यदेव धन्वंतरी हे प्राचीन भारतातील एक महान चिकित्सक होते. दीपावलीच्या दोन दिवस अगोदर कार्तिक त्रयोदशी या दिवशी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी मानवी समाजाला दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी प्रार्थना केली जाते.
यंदाची धनत्रयोदशी संध्याकाळी 4:33 पासून सुरू होईल. आज पूर्वा फाल्गुनी नक्षत्र 1.49 मिनिटांपूर्वी असेल आणि ब्रह्मयोग संध्याकाळी 5.10 मिनिटांपर्यंत राहील. यानंतर इंद्र योग सुरू होईल.
धनत्रयोदशेच्या पूजेची वेळ आणि मुहूर्त
22 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:33 वाजता धनत्रयोदशी सुरू होईल. धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5:04 पर्यंत असेल. राहू काल सकाळी 9 ते 10:30 पर्यंत राहील. कुंभ दुपारी 3.38 ते 5:6 पर्यंत राहील आणि 8.41 ते 10.55 पर्यंत वृषभ राशीत राहील.
धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोषकाळ किंवा वृषभ राशीत कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करणे उत्तम मानले जाते. भगवान धन्वंतरी यांना हिंदू धर्मात देव वैद्याचा दर्जा आहे. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी अमृत चोघडिया, लाभ चोघडिया, वृषभ राशीत धन्वंतरी पूजन करावे. अशा स्थितीत धनत्रयोदशीच्या पूजेसाठी 6 वाजून 7:30 आणि नंतर 9 वाजून 30 मिनिटांपर्यंतचा काळ उत्तम राहील.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 हजार बेरोजगारांना नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीमध्ये रोजगार मेळ्याचा शुभारंभ होणार आहे. केंद्र सरकारनं 10 लाख नोकऱ्यांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात आज देशातील 75 हजार बेरोजगारांना आज नोकरींचं नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. केंद्रीय सशस्त्र बल, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनो, आयकर निरीक्षक या विविध पदांसाठी यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे भरती बोर्डच्या माध्यमातून ही भरती केली जात आहे. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नियुक्तीपत्र दिलेल्यांशी संवाद साधणार आहेत. मुंबईत पियुष गोयल, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार या रोजगार मेळा कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. नागपुरातही रेल्वेच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात 200 तरुणांना रेल्वे आणि केंद्र सरकारच्या इतर विभागात संदर्भात नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.
आजपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू
नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिसला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदिल दाखवला आहे. आजपासून माथेरान मिनी ट्रेन सर्व्हिस पुन्हा सुरू होणार आहे. ऑगस्ट 2019 पासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन बंद होती. नेरळ ते माथेरान दोन आणि माथेरान ते नेरळ दोन अशा एकूण चार फेऱ्या दिवसभरात चालणार. तर अमन लॉज ते माथेरान दरम्यान दिवसाला 12 फेऱ्या चालणार.