22 November : पंतप्रधान मोदी रोजगार मेळाव्याला ऑनलाईन संबोधित करणार, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवरील बेहिशेबी मालमत्तेबाबतच्या याचिकेवर सुनावणी, आज दिवसभरात
Todays Headline 22 November : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
मुंबई : पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीनं 71 हजार नियुक्तीपत्रे देणार आहेत. देशात 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. शिवाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात सुनावणी होणार आहे.
पंतप्रधान मोदी रोजगार मेळाव्याला ऑनलाईन संबोधित करणार
पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीनं 71 हजार नियुक्तीपत्रे देणार आहेत. देशात 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील तळेगाव येथे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोंदी ऑनलाईन सहभागी होणार आहेत.
बारसू रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
बारसू रिफायनरी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. कोकणातील या रिफायनरच्या मुद्द्यावरून आता ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आलेत. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिलं आहे. 'आधी स्थानिकांशी चर्चा करावी, आम्ही स्थानिकांसोबत' असं या पत्रात लिहिलेलं आहे. विनायक राऊत या बैठकीला हजर राहणार नाही असंही त्यांनी या पत्रात म्हटलंय.
अजित पवार यांची पत्रकार परिषद
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात सुनावणी होणार आहे. देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सलील देशमुखही सहआरोपी आहेत.
आळंदीत माऊलींचा संजीवन समाधी सोहळा
आज सकाळी 11 माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे.
बुलढाण्यात नाना पटोले आणि अतुल लोंढे यांची पत्रकार परिषद
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
प्रदीप शर्मा आणि रियाझ काझी यांच्या जामीन अर्जावर सुनावणी
मनसूख हिरेन हत्याकांडातील आरोपी प्रदीप शर्मा आणि रियाझ काझी यांच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी
अभिनेता आदित्य पांचोलीच्या याकिकेवर सुनावणी
बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीनं त्याच्याविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
सुप्रिया सुळे पुरंदर आणि बारामती तालुक्यातील गावभेटीच्या दौऱ्यावर
खासदार सुप्रिया सुळे पुरंदर आणि बारामती तालुक्यातील गावभेटीच्या दौऱ्यावर असणार आहेत. सकाळी पुरंदर तालुक्यातील बोपगाव, भिवडी गावांना भेट देतील. त्यांनंतर सुप्रिया सुळे भिवंडी गावात भेट देणार आहेत. दुपारनंतर सुप्रिया सुळे या बारामती तालुक्यातील ४ गावांना भेट देतील.
सोलापुरात काँग्रेसतर्फे मानवी साखळी करुन निषेध आंदोलन
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी दोघांचीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे मानवी साखळी करुन निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, सकाळी ११ वाजता.
नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची आज मतमोजणी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे.. अधिसभा म्हणजेच सिनेटसाठी प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि महाविद्यालयीन शिक्षक या तीन मतदारसंघासाठी मतमोजणी होणारच आहे. त्याशिवाय विद्या परिषद, अभ्यास मंडळसाठीची मतमोजणीही होणार आहे.
अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची आज मतमोजणी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. अधिसभेसाठी प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, महाविद्यालयीन शिक्षक, विद्यापीठ शिक्षक, विद्या परिषद, अभ्यास मंडळे या संवर्गातील मतदारसंघारीता 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडली.