Todays Headline 11th october : आज उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन, जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
Todays Headline : आज उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या निमित्ताने देशभरातील शिवालयामध्ये पूजा करण्यात येणार आहे. देशभरातील महादेवाच्या 500 हून अधिक मंदिरांमध्ये पूजेचे आयोजन करण्यात आलं आहे.
मुलायम सिंह यांच्यावर अंतिम संस्कार
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांच्यावर आज दुपारी 3 वाजता अंतिम संस्कार केलं जाणार आहे. त्यापूर्वी सकाळी 10 ते 2 या वेळेत त्यांचे पार्थिव सैफईच्या मेला ग्राऊंडमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या या अंतिम संस्कारावेळी देशभरातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते 'नेताजी' या नावाने प्रसिद्ध होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये 1300 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज तिसरा दिवस असून ते आज अहमदाबादमध्ये 1300 रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.
पंतप्रधान उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये जाणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता ते उज्जैनच्या महाकालेश्वरच्या मंदिरात जाणार असून त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेणार आहेत आणि पूजा करणार आहेत. त्यानंतर ते उज्जैनच्या महाकालेश्वर कॉरिडॉरचे उद्धाटन करणार आहेत. त्यानंतर कार्तिक मेला ग्राऊंडवर आयोजित सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणार आहेत आणि सभेला संबोधन करणार आहेत.
महाकाल पथावर 108 स्तंभ आहेत. या स्तंभांवर शंकराच्या आयुष्यावर आधारित विविध शिल्प साकारण्यात आली आहेत. मोदी जेव्हा उद्घाटनासाठी पोहचतील तेव्हा 600 साधू मंत्रोच्चार आणि शंखनाद करतील. कॉरिडोरच्या प्रवेशद्वारावर 20 फूट उंच धाग्यापासून शिवलिंग तयार करण्यात आलं आहे.
शिंदे गटाला उद्या चिन्ह मिळण्याची शक्यता
आज उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं असून त्यांना मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. तसेच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. पण शिंदे गटाने दिलेल्या तीन चिन्हांच्या पर्यायापैकी एकही चिन्ह त्यांना मिळालं नाही. त्यासाठी आज शिंदे गटाला नवीन तीन पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार शिंदे गट आज तीन नवे पर्याय देणार असून त्यापैकी एक चिन्ह त्यांना मिळणार आहे.
अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस
आज बीग बी अमिताभ बच्चन यांचा 80 वा वाढदिवस आहे. महानायक अमिताभ बच्चन आज 80 वर्षांचे होणार आहेत.