11 January In History : माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी, राहुल द्रविड आणि कैलाश सत्यार्थी यांचा जन्मदिवस; आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं...
देशाचे दुसरे पंतप्रधान आणि 'जय जवान, जय किसान'चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांचे 11 जानेवारी 1966 रोजी निधन झाले. त्याशिवाय इतिहासात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. जाणून घेऊयात, आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं?
On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदवलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 11 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. देशाचे दुसरे पंतप्रधान आणि 'जय जवान, जय किसान'चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांचे 11 जानेवारी 1966 रोजी निधन झाले. स्वच्छ प्रतिमा आणि साधेपणासाठी ओळखले जाणारे शास्त्री यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर 9 जून 1964 रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. याशिवाय बालमजुरीविरुद्ध आवाज उठवणारे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 11 जानेवारी 1954 रोजी झाला. याबरोबरच भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा जन्म 11 जानेवारी 1973 रोजी इंदोर येथे झाला.
1922 : मधुमेहाच्या रुग्णाला प्रथमच इन्सुलिन देण्यात आले
100 वर्षांपूर्वी 1921 मध्ये इन्सुलिनचा शोध लागला होता. कॅनेडियन सर्जन फ्रेडरिक बॅंटिंग आणि वैद्यकीय विद्यार्थी चार्ल्स बेस्ट यांनी कुत्र्याच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन काढण्याचा मार्ग शोधला. त्याआधी अनेक वर्षे 1889 मध्ये ऑस्कर मिन्कोव्स्की आणि जोसेफ वॉन मेरिंग या दोन जर्मन शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, कुत्र्याच्या शरीरातून स्वादुपिंड काढून टाकल्यास त्यांना मधुमेह होतो. 1910 मध्ये शास्त्रज्ञांनी स्वादुपिंडातील पेशी ओळखल्या ज्या इन्सुलिन तयार करण्यासाठी फायदेशीर होत्या. ज्या लोकांना मधुमेह होता त्यांच्या स्वादुपिंडात रसायन तयार केले जात नाही. सर एडवर्ड अल्बर्ट शार्पे-शेफर यांनी हा शोध लावला. लॅटिन शब्द इन्सुलाच्या आधारे त्यांनी या रासायनिक इन्सुलिनचे नाव दिले. 1921 मध्ये कॅनेडियन सर्जन फ्रेडरिक बॅंटिंग यांनी कुत्र्याच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन वेगळे केले. त्याच्या मदतीने तो मधुमेहाने त्रस्त असलेल्या दुसऱ्या कुत्र्याला 70 दिवस जिवंत ठेवू शकला. इन्सुलिन चमत्कार करू शकते हे या संशोधनातून समजले. यानंतर दोन संशोधक जे.बी. कॉलिप आणि जॉन मॅक्लिओड यांच्या मदतीने प्राण्यांच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन काढण्यात आले.11 जानेवारी 1922 रोजी लिओनार्ड थॉम्पसन नावाच्या 14 वर्षांच्या मुलाला पहिल्यांदा इन्सुलिनचे इंजेक्शन देण्यात आले.
1942 : दुसऱ्या महायुद्धात जपानने क्वालालंपूर ताब्यात घेतले
दुसरे महायुद्ध हे 1939 ते 1945 पर्यंत चाललेले जागतिक युद्ध होते. या युद्धात सुमारे 70 देशांचे भू-जल-वायुसेना सहभागी झाल्या होत्या. या युद्धात जग दोन भागात विभागले गेले होते. यादरम्यान 11 जानेवारी 1942 रोजी जपानने क्वालालंपूर ताब्यात घेतले होते.
1954 : बालमजुरीविरुद्ध आवाज उठवणारे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचा जन्म
बालमजुरीविरुद्ध आवाज उठवणारे नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे 11 जानेवारी 1954 रोजी झाला. भारतातील बालहक्कांसाठी लढा देणारे कैलाश सत्यार्थी यांना 2014 चा नोबेल शांतता पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. शांततेचा नोबेल पारितोषिक मिळविणारे कैलाश सत्यार्थी हे मदर तेरेसा (1979) नंतरचे दुसरे भारतीय आहेत. कैलाश सत्यार्थी हे मुलांच्या हक्कांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते बालहक्कांसाठी वर्षानुवर्षे लढत आहेत. कैलाश सत्यार्थी यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची नोकरी सोडून तीन दशकांहून अधिक काळ बाल हक्कांचे संरक्षण आणि अंमलबजावणी करण्यासाठी स्वतःला समर्पित केले. आतापर्यंत त्यांनी तब्बल 80,000 बालकामगारांना मुक्त केले असून त्यांना जीवनात नवीन दिशा दिली.
1962 : पेरूच्या वायव्य पर्वतीय प्रदेशात खडक आणि बर्फामध्ये जवळपास 2,000 लोकांचा मृत्यू
पेरूच्या वायव्य पर्वतीय प्रदेशात खडक आणि बर्फामध्ये जवळपास 2,000 लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी बर्फ आणि खडकांच्या थराखाली अनेक गावे आणि शहरे गाडली गेली. ही अतिशय भयंकर घटना आजच्या दिवशी म्हणजे 11 जानेवारी 1962 रोजी घडली.
1966 : माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी
देशाचे दुसरे पंतप्रधान आणि 'जय जवान, जय किसान'चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांचे 11 जानेवारी 1966 रोजी निधन झाले. स्वच्छ प्रतिमा आणि साधेपणासाठी ओळखले जाणारे शास्त्री यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर 9 जून 1964 रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. जवळपास 18 महिने ते देशाचे पंतप्रधान राहिले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1965 च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. 11 जानेवारी 1966 च्या रात्री ताश्कंदमध्ये पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्याशी युद्ध संपवण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर गूढ परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला.
1973 : भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा जन्म
रालुह द्रविडला भारतीय संघाचा विशेशत: कसोटी संघाचा पहिल्या फळीचा खेळाडू म्हणून ओळखले जाते. द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास 24,177 धावा केल्या आहेत. त्याला भारतीय संघाच्या फलंदाजी गटात द वॉल या नावाने ओळखले जाते. राहुल द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 रोजी इंदोर येथे झाला. काही वर्षांनंतर त्याचे आईवडील बंगलोर येथे स्थायिक झाले. द्रविडने आपले शिक्षण सेंट जोसेफ बॉईज हायस्कूल , बेंगलोर येथून पूर्ण केले आहे आणि सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्स, बंगळुरू येथून त्याने वाणिज्य शाखेत पदवी मिळविली. 4 मे 2003 रोजी त्याने विजेता पेंढारकर यांच्याशी लग्न केले. त्याची पत्नी डॉक्टर आहे. त्यांना दोन मुले आहेत.
आपल्या नियमित कामगिरीमुळे 1994 मध्ये विल्स वर्ल्ड सीरिजच्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी राहुल द्रविडला संघात घेतले गेले. पण तो अंतिम 11 मध्ये खेळू शकला नाही. द्रविडने अखेर 3 एप्रिल 1996 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंका संघाविरुद्ध खेळताना पदार्पण केले.
2001 : भारत आणि इंडोनेशिया यांच्यात संरक्षण करार
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि इंडोनेशियातील संबंध खूप चांगले आहेत. भारत आणि इंडोनेशिया हे शेजारी देश आहेत. भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांची अंदमान समुद्रात इंडोनेशियाशी सागरी सीमा आहे. दोन्ही देशांमधील संबंधही सुमारे दोन हजार वर्षे जुने आहेत. आजच्या दिवशी म्हणजे 11 जानेवारी 2001 रोजी भारत आणि इंडोनेशिया यांच्यात पहिल्यांदा संरक्षण करार झाला.
2021 : हेरिटेज संवर्धन समितीने भारताच्या नवीन संसद भवनाच्या बांधकामाला मंजुरी दिली
11 जानेवारी 2021 रोजी वारसा संवर्धन समितीने सेंट्रल व्हिस्टा पुनर्निर्माण प्रकल्पांतर्गत संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला मंजुरी दिली. त्याआधी या समितीकडून मान्यता घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला निर्देश दिले होते. समितीने या प्रस्तावावर चर्चा करून मंजुरी दिल्याचे गृहनिर्माण सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी त्यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची घोषणा सप्टेंबर 2019 मध्ये करण्यात आली होती. या अंतर्गत त्रिकोणाच्या आकारातील नवीन संसद भवन बांधण्यात येणार असून त्यामध्ये 900 ते 1, 200 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था असेल.
2021 : महिलांना प्रार्थनेदरम्यान गॉस्पेल वाचण्याची परवानगी देण्यासाठी चर्चचे नियम बदलले
पोप फ्रान्सिस यांनी इतर गोष्टींबरोबरच महिलांना प्रार्थनेदरम्यान गॉस्पेल वाचण्याची परवानगी देण्यासाठी 11 जानेवारी 2021 रोजी चर्चचे नियम बदलले.